अल्पवयीन मुलाचा खोडसाळपणामुळे मुंबईत खळबळ; ताजमध्ये अतिरेकी घुसल्याच्या कॉल पोलिसांची धावाधाव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 08:35 PM2021-06-26T20:35:24+5:302021-06-26T20:37:38+5:30
Crime News : कराडमधील नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंबई येथील हाॅटल ताजमध्ये दूरध्वनी केला
कराड : ‘मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये पाठीमागच्या दरवाजातून दोन अतिरेकी एके ४७ रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत आहेत,’ अशी माहिती दूरध्वनीवरुन देणाऱ्या अल्पवयीन मुलाची कराड शहर पोलिसांनी नातेवाईकांसह चौकशी केली. यावेळी त्याने गंमत म्हणून हा प्रकार केल्याचे सांगितले. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेची प्रचंड पळापळ झाली.
याबाबत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले की, कराडमधील नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने मुंबई येथील हाॅटल ताजमध्ये दूरध्वनी केला. हॉटेलमध्ये फोन उचलल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाने ताजमहाल हॉटेलच्या पाठीमागील दरवाजातून दोन अतिरेकी एके ४७ रायफल घेऊन घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना रोखा व बंदोबस्त वाढवावा असे सांगितले.
याबाबतची माहिती कुलाबा पोलिसांनी त्वरित कराड पोलिसांना सांगितली. कराड शहर पोलिसांनी ज्या क्रमांकावरून फोन करण्यात आला त्यावर संबंधित व्यक्तीकडे चौकशी केली असता तो फोन मुलगा वापरत असल्याचे संबंधितांनी सांगितले. मुलगा नववीमध्ये शिकत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नातेवाईकांसमोरच संबंधित मुलाकडे चौकशी केली असता त्याने गंमत म्हणून फोन केल्याचे सांगितले. तसेच शुटाऊट वडाळा, २६/११ यासारखे चित्रपट बघितल्याने चित्रपटाचा प्रभाव असल्याचेही सांगितले. प्रथम दर्शनी केलेल्या चौकशीमध्ये संबंधित अल्पवयीन मुलाचा समाज विघातक घटनांशी कुठलीही संबंध असल्याचे दिसून येत नाही. संबंधित मुलाने गंमत म्हणून हा फोन केल्याचे दिसून येत आहे. तरीही याची सखोल चौकशी करून काही आक्षेपार्ह आढळल्यास योग्य ती कारवाई करणार असल्याचेही वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.
दोन बंदूकधारी हॉटेल ताजमध्ये घुसणार; असा कॉल आल्याने उडाली खळबळ https://t.co/wglylOT2vv
— Lokmat (@MiLOKMAT) June 26, 2021