वसईत खळबळ! चांदीप येथे जिलेटीन व स्फोटक पदार्थ सापडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 04:23 PM2019-03-04T16:23:09+5:302019-03-04T16:29:45+5:30
चांदीप रेती बंदरामध्ये सेक्शन पंपातून अवैध रेती उपसा होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
पारोळ - पालघरचे जिल्हा अधीक्षक यांच्या पथकाने चांदीप रेती बंदरावर रविवारी रात्री कारवाई केली ही कारवाई करत 24 जिलेटीनच्या कांड्या व स्फोटक पदार्थ सापडले या प्रकाराने मोठी खळबळ माजली. चांदीप रेती बंदरामध्ये सेक्शन पंपातून अवैध रेती उपसा होत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.
पालघर पोलीस अधीक्षक यांच्या खास पथकाने या बंदरात कारवाई सुरू केली असता. रेती भरलेल्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. या परिसराची झडती घेत असताना एका बॅगेत जिलेटीनच्या कांड्या व स्फोटक पदार्थ सापडल्याने पोलिसांनी बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करून त्यांच्या ताब्यात ही स्फोटक पदार्थ तपासणीसाठी दिले असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर या कारवाईत आरोपी हाती न लागल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात विरार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाई बाबत सूत्रांनी दिलेल्या माहिती वरून ही स्फोटके रेती काढण्यासाठी आणली असावीत अशी माहिती त्यांनी दिली. तर तानसा नदीत पाण्यात खाली ही स्फोटकांचा स्फोट करून ती पाण्याखाली पसरलेली रेती सेक्शन मशीनने काठावर जमा केली जाते. या स्फोटकाचा वापर पाण्याखाली रेती सैल करण्यासाठी होत असल्याचा माहिती खास सूत्रांनी दिली.