खळबळजनक! मांजरा नदीपात्रात सुटकेसमध्ये आढळला तरुणीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 09:55 PM2019-12-24T21:55:28+5:302019-12-24T21:58:09+5:30
धनेगाव-उमरगा परिसरातील नदीपात्रात तरंगत होती सुटकेस
लातूर - लातूरपासून जवळ असलेल्या धनेगाव-उमरगा येथील मांजरा नदीपात्रातील पाण्यात मंगळवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास एका भल्यामोठ्या सुटकेसमध्ये अंदाजे २५ ते ३० वर्षे वयाच्या तरुणीचे प्रेत तरंगत असल्याचे आढळले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उत्तरीय तपासणीसाठी प्रेत ताब्यात घेतले आहे़. कोणीतरी खून करून प्रेत सुटकेसमध्ये कोंबून पाण्यात टाकले असावे, असा अंदाज वर्तवून लातूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी सांगितले, धनेगाव ते उमरगा जाणाऱ्या रस्त्यालगत पाण्यामध्ये सुटकेस तरंगत असल्याची माहिती परिसरातील ग्रामस्थांनी लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कळविली़ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा सुटकेसमध्ये अंदाजे २५ ते ३० वर्ष वयाच्या तरुणीचे प्रेत आढळले. प्रेत पाण्याने फुगले आहे. त्यामुळे ओळख पटणे अवघड झाले आहे़ दोन दिवसांपूर्वी सदर प्रेत पाण्यात टाकले असावे, अशी शक्यता आहे़ काळ्या रंगाचे एक चारचाकी वाहन या परिसरातून दोन दिवसांपूर्वी गेले होते़ त्या वाहनातूनच सुटकेस टाकली असेल़ शिवाय, त्यानंतरही एक पांढºया रंगाची कार तेथे थांबली होती, अशी माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे़ ग्रामस्थांच्या या माहितीवरून पोलिसांनी तपास सुरू केला आहे़ दरम्यान, घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, पोलीस उपाधीक्षक सचिन सांगळे, पोलीस निरीक्षक पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे़ दरम्यान, पोकॉ़ गुडे पाटील यांच्या तक्रारीवरून ३०२, २०१ भादंविप्रमाणे लातूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू : पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने
मृतदेह पाण्याने फुगला आहे़ त्यामुळे ओळख पटणे अवघड झाले आहे़ दरम्यान, शेजारच्या पोलीस ठाण्यांमध्ये तसेच शेजारील जिल्ह्यात व राज्यात या दोन-तीन दिवसात मिसिंगची घटना घडली आहे का, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे़ मिसिंगच्या घटना कळल्यानंतर ओळख पटणे सोयीचे होईल. त्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले आहे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.