खळबळजनक! पत्नीचा गळा चिरून पतीची रेल्वेखाली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 03:16 PM2019-08-22T15:16:22+5:302019-08-22T15:25:13+5:30
तालुक्यातील खळबळजनक घटनेप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली
मधुकर ठाकूर
उरण - उरण तालुक्यातील जासई गावात बिहारमधून रोजगाराच्या निमित्ताने आलेल्या किरण देवी राय (२५ ) हिची पतीने तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्घुणपणे हत्या केली आहे. पत्नीच्या हत्येनंतर पती राजकुमार राय (३०) यानेही रांंजणपाडा नजीक रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याचे आढळून आले आहे. तालुक्यातील खळबळजनक घटनेप्रकरणी उरण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी दिली.
उरण तालुक्यातील जासई गावात रोजगाराच्या निमित्ताने राजकुमार राय हा कामगार आपली पत्नी आणि तीन मुलींसह राहाण्यास आला होता. बिहार राज्यातून २० दिवसांपूर्वी आलेला राजकुमार सुपरवायझर म्हणून टीआयपीएल या कंपनीत काम करीत होता. मंगळवारी रात्रीच्या दरम्यान अज्ञात कारणावरून राजकुमार याने संतापाच्या भरात पत्नीचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून निर्दयीपणे हत्या केली. पत्नीच्या निर्घृणपणे केलेल्या हत्येनंतर पस्तावलेल्या राजकुमारने जासई गावाजवळच असलेल्या रांजणपाडा गावाबाहेर मालगाडीखाली जीव दिल्याचे आढळून आले आहे.
खुनाची घटना समजताच एसीपी विठ्ठल दामगुडे आणि उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेतली.रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आईचा मृतदेह आणि मृतदेहाच्या बाजूलाच अजाण तीनही मुलींचा चाललेला आक्रोश पाहून क्षणभर पोलिसांचेही डोळे पाणावले.पोलिसांनी तपासाला सुरुवात करताच पती राजकुमार घटनास्थळावरून गायब झाल्याचे आढळून आले. अधिक तपास करताना पोलिसांना त्याच दिवशी रांजणपाडा गावाजवळच मालगाडीच्या रुळावर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. या मृतदेहाची ओळख पटली असून तो राजकुमार याचाच असल्याची खातरजमा पोलिसांकडून करण्यात आली आहे.
पत्नीच्या हत्येनंतर पती राजकुमार राय याने झालेल्या पश्चातापानंतर रेल्वेखाली आत्महत्या केली असल्याची शक्यता वपोनि जगदिश कुलकर्णी यांनी माहिती देताना व्यक्त केली आहे.तसेच मातृपित्रु छत्र हरपलेल्या या तीनही मुलींना बालसंगोपन केंद्रात पाठविण्यात आल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.या प्रकरणी एसीपी विठ्ठल दामगुडे आणि उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदिश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे पोलीस निरीक्षक अतुल अहेर व गौतम तायडे अधिक तपास करीत आहेत. मात्र, या खळबळजनक घटनेमुळे उरण परिसरात खळबळ माजली आहे.