खळबळजनक! ९ वर्षाच्या मुलीच्या हत्येतील मुख्य आरोपीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 09:52 PM2019-12-19T21:52:31+5:302019-12-19T22:00:29+5:30
मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील आहे.
मीरारोड - ९ वर्षाच्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह कसारा घाटात फेकण्यात आल्याच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला प्रकाश हरी राठोड (३८) याचा मृतदेह उत्तन भागातील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेह कुजलेल्या अवस्थेतील आहे.
उत्तनच्या धावगी मार्गावरील रिध्दी सिध्दी इमारतीत राहणारा प्रकाश राठोड याने औरंगाबदच्या कन्नड तालुक्यातील चाफेनेर येथून आपल्या मावसभावाची ९ वर्षांची मुलगी भारती चव्हाण हिला तिच्या आईकडून फिरण्यासाठी व शिक्षणासाठी ६ महिन्यापूर्वी घरी घेऊन आला होता. परंतु भारतीशी संपर्क होत नसल्याने तसेच राठोडचा फोन लागत नसल्याने आई हिना हिने ४ डिसेंबर रोजी उत्तन गाठले. पण प्रकाशच्या घराला टाळे असल्याने ५ डिसेंबर रोजी तिच्या फिर्यादीवरून उत्तन पोलीसांनी प्रकाश विरोधात गुन्हा दाखल करुन घेतला होता.
उपअधिक्षक शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास सुरु झाला. पोलीसांनी प्रकाशची पत्नी अनिता व नंतर भाचा आकाश चव्हाण याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता भारतीच्या हत्येचा उलगडा झाला. प्रकाशने चिमुरड्या भारतीला तीच्या आईची दिशाभुल करुन घरातील घरकाम करण्यासाठी आणले होते. घरकाम करण्यासाठी तिचा छळ केला जात होता. प्रकाश व अनिता तिला मारहाण करत असत. ७ नोव्हेंबर रोजी लहानग्या भारतीने अस्वच्छता केली म्हणून प्रकाशने तिचा गळा आवळून खून केला.तिचा मृतदेह प्लास्टिक ड्रममध्ये टाकून त्यात माती व सिमेंट टाकून ठेवले. तिचा मृतदेह ड्रमसह १२ नोव्हेंबर रोजी आकाशने कसारा घाटात टाकून दिला असल्याचे समोर आले.
पोलीसांनी अनिता व आकाशला अटक केली होती. मात्र, मुख्य आरोपी असलेला प्रकाश मात्र सापडत नव्हता. पोलीस त्याचा शोध घेत होते. तोच बुधवारी सकाळी उत्तनच्या धावगी डोंगर भागातील जंगलातून दुर्गंधी येत असल्याने तेथून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी पोलीसांना कळवले. पोलीसांनी शोध घेतला असता एका झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास घेतलेल्या पण कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला. सदर मृतदेहाच्या कपड्यातील खिशात सापडलेल्या आधार ओळखपत्रावरुन प्रकाशचा मृतदेह असल्याचा निष्कर्ष पोलीसांनी काढला आहे. त्याचा मृतदेह तपासणी आणि चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.