खळबळजनक! नरेंद्र मेहतांकडून माझ्या जीवास धोका; भाजपाच्याच नगरसेविकेने केले गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 08:18 PM2020-02-25T20:18:54+5:302020-02-25T20:21:32+5:30
भाजपाचे माजी आमदार मेहतांच्या विरोधात भाजपा नगरसेविकेची तक्रार
मीरारोड - मीरा भाईंदर भाजपाचे सर्वेसर्वा व माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात भाजपाच्याच नगरसेविका नीला सोन्स यांनी कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांना तक्रार केली आहे. मेहतांकडून गेल्या काही वर्षांपासून अत्याचार होतअसून मला व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे सोन्स यांनी म्हटले आहे. या तक्रारीमुळे खळबळ उडाली आहे.
मीरा भाईंदर महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी एकीकडे भाजपा व महाविकास आघाडी यांच्यात जोरदार चुरस असताना सोमवारी सायंकाळी मेहता यांनी त्यांच्या फेसबुकवर पोस्ट टाकून आपण भाजपा तसेच राजकारणाला सोडचिठ्ठी देत असल्याचे सांगत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. माझ्या कृती, पध्दती वा माझ्या आचरणामुळे भाजपाचे नुकसान होत आहे. माझ्यामुळे पक्षाच्या नेत्यांना लाज वाटेल, मानखाली घालावी लागेल असे काही मी सहन करु शकत नाही असे मेहतांनी सांगितल्याने त्यांना देखील पुढच्या घटनाक्रमाचा अंदाज आला असल्याची शक्यता आहे.
लोकमतने देखील निवडणुकीवरुन सोमवारी सायंकाळी झालेला वाद आणि सोन्स यांनी भाजपा नेत्यास दिलेली क्लीप या नंतर तासाभराच्या आतच मेहतांनी फेसबुकवर पोस्ट टाकून व नंतर व्हिडिओ टाकून आपण भाजपा व राजकारण सोडत असल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, भाजपा नगरसेवकांना गोव्यावरुन आणून वरसावे येथील मेहतांच्या सीएन रॉक हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. सोमवारी सायंकाळी भाजपा आणि राजकारण सोडल्याचे सांगणारे मेहता आज मंगळवारी मात्र सीएन रॉक हॉटेलमध्ये भाजपा नगरसेवकांसह माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबत उपस्थित होते. भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील म्हणाले की, आम्ही नगरसेवकांनी आणि चव्हाणांनी पक्ष सोडू नका, तुमची गरज आहे असा आग्रह मेहतांकडे धरला होता. मेहतांनी महापौर, उपमहापौर सह स्थायी समिती सभापती भाजपाचा निवडून आणायचाच असे आवाहन केल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, मेहतांचे दोन व्हिडिओ काही संदेश समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. तर दुसरीकडे भाजपा नगरसेविका नीला सोन्स यांनी त्यांच्या फेसबुकवर व्हिडओ पोस्ट करुन आपण पोलीस महानिरीक्षक तसेच ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला असून नरेंद्र मेहतांकडून मला, मुलाला व कुटुंबाच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. हे आजचे नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून चालले असून या आधी आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार केली होती.
मेहता हे भाजपाच्या आड अनैतिक व गैर प्रकार करत असल्याचे पक्षाच्या वरिष्ठांना आपण कळवले होते. मेहतांच्या अनैतिक कामांना उघड करण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केले होते व ते पक्षश्रेष्ठींना दिले होते. जनतेने नाकारलेल्या मेहतांना त्यांच्या या अनैतिक व गैरकामांमुळे पक्षाने पण नाकारावे अशी भूमिका होती. माझी मेहताशी लढाई ही माझ्या मान व जीवा साठी आहे. माझ्या व मुलाच्या हक्काची लढाई आहे. यातुन प्रत्येक महिला जीचे शोषण झाले तीला पण ताकद मिळेल असे सोन्स यांनी म्हटले आहे. या लढाईत सर्वांची साथ हवी आहे असे आवाहन नीला यांनी केले आहे.