खळबळजनक! राहत्या इमारतीत वकीलच चालवत होता जुगाराचा अड्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 10:25 PM2019-12-22T22:25:13+5:302019-12-22T22:27:17+5:30
गुन्हे शाखेची कारवाई, वकिलासह ८ जणांना अटक
मुंबई - कफ परेड येथे राहत्या इमारतीत वकीलच जुगाराचा अड्डा चालवत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाली आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष १ ने अॅड. ललित जैनसह ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
ललित जैन (४६) असे या वकिलाचे नाव आहे. कफ परेड येथील मीनू मायनर इमारत येथे हा जुगाराचा अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या कक्ष १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक मेर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक महेश तावडे, एपीआय अनंत शिंदे, पीएसआय ज्ञानेश्वर जगताप, अंमलदार संतोष लोखंडे, तानाजी मोरे, जितेंद्र शेडगे, नितीन तायडे, शैलेश शिंदे आणि चालक अमोल वऱ्हाडी या तपास पथकाने छापा टाकला. या कारवाईत पावणेतीन लाखांच्या रोकडसहित प्लास्टिक कॉईन, खेळाचे पत्ते जप्त केले आहेत.
त्यांनी एका खोलीतच जुगाराचा अड्डा तयार केला होता. या कारवाईतून गुन्हे शाखेने जैनसह ८ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. यात वकील आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. ज्या इमारतीत जुगाराचा अड्डा सुरू होता ती इमारत पागडी पद्धतीची असून जैन याच्या मालकीची आहे. तो मित्रांसोबत येथे जुगार खेळण्यासाठी येत असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, या प्रकरणी गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.