जाब विचारल्याने तरूणाचा खून, पिंपरीतील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 01:21 AM2019-03-17T01:21:49+5:302019-03-17T01:28:32+5:30
कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून विमाननगर आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शास्त्राने वार करीत खून केला.
पिंपरी - कानाखाली मारल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून विमाननगर आयटी पार्कमधील एका कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा चार ते पाच जणांच्या टोळक्याने धारदार शास्त्राने वार करीत खून केला. ही घटना पिंपरीतील डिलक्स चौक येथे घडली.
मंजीत मोतीलाल प्रसाद (रा. २२, काळेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी धर्मेश श्यामकांत पाटील, यशवंत ऊर्फ अनिल लक्ष्मण गायकवाड (वय २०, दोघेही रा. गोकुळधाम हौसिंग सोसायटी, मिलिंदनगर, पिंपरी), स्वप्निल संजय कांबळे (वय २५, रा. मोनिका अपार्टमेंटजवळ, आदर्शनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर इतर साथीदार फरार आहेत. मोहन संभाजी देवकाते (वय २५, रा. खराडीरोड, चंदननगर, पुणे) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंजीत हे विमाननगर येथील डब्ल्यू.एन.एस. या कंपनीत डाटा एन्ट्री तसेच कॉल सेंटरचे काम पाहत होते. या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सोडविण्यासाठी फिर्यादी देवकाते हे शुक्रवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरमधून चालले होते. दरम्यान, टेम्पो ट्रॅव्हलर पिंपरीतील डिलक्स चौकात आला असता दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी देवकाते यांना गाडी थांबविण्याचा इशारा केला. देवकाते यांनी गाडी थांबविली असता ‘क्या हो गया’ असे मंजित प्रसाद हे देवकाते यांना म्हणताच आरोपींपैकी एकाने मंजित यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर कानाखाली का मारली, असे विचारण्यासाठी मंजित खाली उतरले.
आरोपींनी मंजित प्रसाद यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चॉपरने खांद्यावर, छातीवर, कमरेवर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मंजित यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अटक आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) रंगनाथ उंडे करीत आहेत.