‘इसिस’मध्ये जाण्यास प्रोत्साहित केल्याबद्दल आठ वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:49 AM2022-01-08T05:49:10+5:302022-01-08T05:49:32+5:30
कारागृहात सहा वर्षे राहिल्यानंतर, या दोघांनी आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असून, समाजात परतायचे आहे आणि स्वतःचे पुनर्वसन करायचे आहे, असे म्हणत आपण दोषी असल्याचे डिसेंबर महिन्यात न्यायालयात मान्य केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मालवणी येथील एका तरुणाला इसिस या दहशतवादी संघटनेत सामील होण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोन तरुणांना विशेष एनआयए न्यायालयाने आठ वर्षांची शिक्षा ठोठावली. या दोघांनीही स्वतःच्या गुन्ह्याची न्यायालयात कबुली दिली होती.
विशेष न्या. ए. टी. वानखेडे यांनी बुधवारी या दोघांचे दोषत्व मान्य केले होते. न्यायालयाने बचाव पक्षाचे वकील ए. आर. बुखारी व एनआयएचे वकील प्रकाश शेट्टी यांनी आरोपी रिझवान अहमद व मोहसिन सय्यद यांच्या शिक्षेसंदर्भात युक्तिवाद केला. शेट्टी यांनी दोन्ही आरोपींना आठ वर्षांची शिक्षा ठोठावण्याची न्यायालयाला विनंती केली. आरोपी रिझवान अहमद (२५) व मोहसिन सय्यद (३२) यांच्यावर २०१८ मध्ये आरोप निश्चित करण्यात आले.
कारागृहात सहा वर्षे राहिल्यानंतर, या दोघांनी आपल्याला आपल्या कृत्याचा पश्चात्ताप झाला असून, समाजात परतायचे आहे आणि स्वतःचे पुनर्वसन करायचे आहे, असे म्हणत आपण दोषी असल्याचे डिसेंबर महिन्यात न्यायालयात मान्य केले. हे दोघेही बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या प्रचारात गुंतले होते. ते कधीही हिंसाचारात किंवा हत्यांमध्ये सहभागी झाले नाहीत. त्यामुळे त्यांना सुधारण्याची संधी मिळाली पाहिजे. गुन्हा घडला, तेव्हा ते अपरिपक्व होते आणि ऑनलाइन इसिसच्या प्रचारामुळे प्रभावित झाले. त्याबद्दल त्यांनी न्यायालयाची माफी मागितली आहे, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले.
गेल्या वेळी न्यायालयाने आरोपींना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात देण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी आतापर्यंत सरकारी वकिलांनी ३९ साक्षीदारांची साक्ष नोंदविली आहे.