माहेरी राहणाऱ्या विभक्त पत्नीचं फेक फेसबुक अकाऊंट, त्याहून अश्लिल पोस्ट!
By प्रदीप भाकरे | Published: March 1, 2023 01:12 PM2023-03-01T13:12:43+5:302023-03-01T13:13:15+5:30
आग्रा येथील पतीचा प्रताप : दत्तापूर पोलीस जाणार का उत्तरप्रदेशात
प्रदीप भाकरे
अमरावती : माहेरी राहत असलेल्या पत्नीचे फेसबुकवर फेक अकाउंट बनवत त्यावरून अश्लिल पोस्ट करण्याचा सपाटा एका माथेफिरू पतीने चालवला आहे. ती बाब महिलेच्या लक्षात येताच तिने याबाबत दत्तापूर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी महिलेच्या विभक्त पतीविरोधात बदनामी व आयटी ॲक्टअन्वये गुन्हा दाखल केला. भगतसिंग असे आरोपीचे नाव असून, तो उत्तरप्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील रहिवाशी आहे.
यातील फिर्यादी ३२ वर्षीय महिला व आरोपी हे नात्याने पती-पत्नी असून आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो फिर्यादी व तिच्या मुलांना नेहमी मारझोड करीत होता. म्हणून फिर्यादी महिला ही पती भगतसिंग याच्यापासून विभक्त झाली. ती पाच वर्षापासून तिच्या आई-वडिलांकडे धामणगाव येथे राहते. दरम्या आरोपीने विभक्त राहत असलेल्या पत्नीच्या नावाचे फेसबुक अकाउंट बनविले. त्यावर विभक्त पत्नीचा फोटो लावून धामणगाव येथील तिच्या ओळखीचे मित्र नातेवाईकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविल्या. त्या ॲक्सेप्ट झाल्यानंतर तो त्या एफबी वॉलवरून त्यांना घाणेरड्या शब्दात मॅसेज करीत आहेत. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर तो त्या एफबी अकाउंटवरून अश्लिलव्हिडिओ देखील पाठवत आहे. दरम्यान एफबी वॉलवर आयडी म्हणून महिलेचे छायाचित्र असल्याने ते तिच्या बदनामीस कारणीभूत ठरले आहे.
जे होते ते करून घे!
त्या फेक आयडीबाबत महिलेच्या चुुलरभावाला माहिती झाले असता, त्याने आरोपी भगतसिंगला फोन करून विचारणा केली. त्यावेळी त्याने शिवीगाळ केली. दरम्यान, २८ फेब्रुवारी सकाळी ११ च्या सुमारास फिर्यादी महिलेने फेसबुक पाहिले असता, त्यावर तिच्या नावाचे व तिचे छायाचित्र असल्याचे दिसून आले. त्यावर अश्लिल भाषेत केलेल्या पोस्टवर आंबटशौकीनांच्या कमेंट देखील तिच्या दृष्टीस पडल्या. याचा जाब विचारण्यासाठी तिने फोन केला आरोपीने तिला तुझ्याकडून जे होते ते करून घे अशी धमकी दिली. त्यामुळे पुढे तिने पोलीस ठाणे गाठले. आरोपीला पकडण्यासाठी दत्तापूर पोलीस युपीला जाणार आहे.