जबरदस्तीने मिठी मारून तरुणीचा केला विनयभंग, पोलिसांनी सीरिअल मोलेस्टरला केली अटक
By पूनम अपराज | Published: December 18, 2020 10:33 PM2020-12-18T22:33:44+5:302020-12-18T22:34:25+5:30
Molestation : ५० पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग करणारा सीरिअल मोलेस्टरच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या
पन्नासहून अधिक महिलांचा विनयभंग केलेल्या एका सिरिअल मोलेस्टरला दिंडोशी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या नराधमाने २०११ पासून ते आतापर्यंत अनेक महिलांचा विनयभंग केला आहे. त्याला आतापर्यंत १२ प्रकरणांमध्ये अटकही झाली आहे. तो अनेक पोलीस ठाण्यांमध्ये मोस्ट वॉण्टेड यादीत होता. आरोपीचे नाव कल्पेश देवधरे असं आहे.
१२ डिसेंबरला दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकी स्वाराने २४ वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मिठी मारली होती. त्यानंतर तिच्याशी गैरवर्तन केलं आणि तेथून फरार झाला. यानंतर तरुणीने दिंडोशी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रार दाखल झाल्यानंतर या आरोपीला पकडण्यासाठी एक विशेष पोलीस पथक नेमण्यात आलं. या पथकाने सर्व सीसीटीव्हीची तपासणी सुरु केली. २०१७ मध्येही पवईत असाच एक गुन्हा घडल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्या गुन्ह्यातील आरोपीची सर्व माहिती पवई पोलीस स्टेशनमधून घेऊन दिंडोशी पोलीस आरोपी कल्पेश देवधरेच्या घरी पोहोचले आणि त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
५० महिलांचा विनयभंग
मुंबईच्या मालाड पूर्वमध्ये दिंडोशी पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या ३० वर्षीय सिरीयल मॉलेस्टरच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. वर्ष २०११ मध्ये या आरोपीला एका महिलेसमोर अश्लील वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि नंतर तो जामिनावर सुटला होता. मात्र, झालेल्या शिक्षेपासून त्याने काहीच धडा घेतला नाही. या नराधमाने जवळपास ५० महिलांचा विनयभंग केला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यानेच ही कबुली दिली आहे. डी. एन नगर, दिंडोशी, पंतनगर, गोरेगाव, कांदिवली, पार्क साईट, बांगूर नगर चुनाभट्टी आदी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात अपहरण आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल आहेत.