नाशिकमध्ये खुनाची मालिका सुरूच; आठवडाभरानंतर एका भाजीविक्रेत्याची हत्या!
By अझहर शेख | Published: August 24, 2023 07:45 PM2023-08-24T19:45:20+5:302023-08-24T19:45:49+5:30
हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखांचे दोन पथक तसेच अंबड गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आहे
नाशिक : शहरात खुनाची मालिका सुरूच असून आठवडाभरात पुन्हा अंबड पोलीस ठाण्याच्याच हद्दीत एका भाजीविक्रेत्याची भर दिवसा दुचाकीस्वार हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सापासप वार करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गुरुवारी (दि.२४) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जुने सिडकोमध्ये हा हल्ला झाला.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुने सिडको शॉपिंग सेंटर चौकात दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चार ते सहा हल्लेखोरांनी भाजीविक्रेता संदीप आठवले ( 22 ,रा.लेखानगर) या युवकावर प्राणघातक हल्ला केला. गंभीरपणे जखमी झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन आठवले याचा जागीच मृत्यू झाला. या खुनी हल्ल्याचा थरार येथील दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाला आहे. आठवले रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्याने बघून दुचाकीस्वार हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले. घटनेची माहिती मिळतात अंबड पोलीस ठाण्याच्या पथकासह गुन्हे शाखा, इंदिरानगर, एमआयडीसी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आठवले याचा मृतदेह तात्काळ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात हलविला. यावेळी परिसरात भीतीचे वातावरण पसरले.पोलिसांनी त्वरीत बंदोबस्त याठिकाणी वाढविला.
हल्लेखोरांच्या शोधासाठी गुन्हे शाखांचे दोन पथक तसेच अंबड गुन्हे शोध पथक रवाना करण्यात आले आहे. आठवले याचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात येतात रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात त्याचा मित्रपरिवार व नातेवाईकांनी गर्दी केली. यामुळे जिल्हा रुग्णालयात सरकारवाडा पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त वाढविण्यात आला. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील पंधरवड्यापासून सातत्याने खुनाच्या घटना घडत आहेत. या पंधरवड्यात चौथ्या युवकाने या भागात अशा प्राणघातक हल्ल्यात आपला जीव गमावला आहे. यामुळे अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगारीने प्रचंड डोके वर काढले असून नागरिकांत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अंबड पोलिसांना मात्र गुन्हेगारांवर अंकुश लावण्यास अद्याप अपयश येत आहे.
टिप्पर गॅंग सक्रिय झाल्याचा आरोप
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकेकाळी धुमाकूळ घातलेल्या टिप्पर गॅंग चे काही गुन्हेगार हे पुन्हा या भागात सक्रिय झाले आहे, असा आरोप मयत आठवले यांच्या नातेवाईकांनी केला आहे. येथील चौकात आठवले हा त्याच्या मितत्रासोबत नाश्त्याला आले होते, याचवेळी हल्लेखोर हातात शस्त्र घेऊन आले आणि त्यांनी आठवले याच्यावर हल्ला केला, असे पोलिसांनी सांगितले.