वर्तनात सुधारणा न झाल्याने सराईत गुन्हेगार स्थानबद्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:40 PM2018-12-04T17:40:39+5:302018-12-04T17:44:13+5:30
तडीपारीची मुदत संपल्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा न झाली नाही़.
पुणे : दोन वर्षासाठी तडीपार केल्यानंतरही त्याच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने शहर पोलिसांनी भवानी पेठेतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए कायद्याअंतर्गत कारवाई करुन त्याला येरवडा कारागृहात स्थानबद्ध केले आहे़.पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम हे पुणे पोलीस आयुक्तपदी आल्यानंतर एमपीडीएअंतर्गत केलेली ही पहिलीच कारवाई आहे़. आरबाज ऊर्फ बबन इक्बाल शेख (वय २४, रा़ चुडामण तालीम चौक, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, आरबाज शेख याच्याविरुद्ध खडक पोलीस ठाण्यात मारामारी, घातक हत्यारे जवळ बाळगणे, घरात घुसून मारहाण करणे, धमकी देणे, खंडणी मागणे, लहान मुलीचा विनयभंग करणे असे ११ गुन्हे दाखल आहेत़. तसेच समर्थ पोलीस ठाण्यात मारहाण करुन सोनसाखळी चोरीचा गुन्हा दाखल आहे़. त्याच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी त्याला २०१७ मध्ये २ वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते़. त्याची तडीपारीची मुदत संपल्यानंतरही त्याच्या गुन्हेगारी वर्तनात सुधारणा न झाली नाही़. बिल्डर, व्यापाºयांना खंडणी मागणे, सर्वसामान्य नागरिकांना विनाकारण त्रास देऊन दहशत निर्माण करण्याचा प्रकार सुरु होता़. त्यामुळे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी त्याच्या स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करुन तो पोलीस आयुक्त डॉ़. व्यंकटेशम यांना सादर केला होता़ .या प्रस्तावाचे अवलोकन करुन डॉ़ व्यंकटेशम यांनी त्याला स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले़. त्यानुसार सोमवारी शेख याला अटक करुन येरवडा तुरुंगात रवानगी केली आहे़. अपर पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, उपायुक्त सुहास बावचे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व विजयकुमार शिंदे, सहायक निरीक्षक वैभव पवार, उपनिरीक्षक राकेश सरडे, महेश बारवकर, महेश कांबळे, दीपक मोघे यांनी प्रस्ताव तयार केला होता़.