नोकराने मालकाचा केला विश्वासघात; लंपास केले दागिने आणि रोकड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 09:32 PM2019-11-27T21:32:06+5:302019-11-27T21:35:34+5:30
पोलिसांनी एक किलो ९२३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
मुंबई - सोने व्यापाऱ्याचा विश्वासाचा गैरफायदा घेत लाखोंचे दागिने आणि रोकड चोरी करून पळालेल्या नोकराला गुन्हे शाखेच्या कक्ष - १० च्या पोलिसांनीअटक केली आहे. संदीप दाऊजी शर्मा (३२) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक किलो ९२३ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
अंधेरी पूर्वेकडील एमआयडीसी येथे राहणाऱ्या सोन्याच्या व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या आरोपीने त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. तसेच त्याने त्यांची विश्वास संपादन करण्यासाठी दिन मोहम्मद असे नाव बदलले. २७ ऑक्टोबर २०१२ रोजी व्यावसायिकाच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने ते सोलापूर येथे गेले. तर इतर कुटुंबीय बकरी ईदसाठी गोवंडी येथे गेले होते. त्यावेळी व्यावसायिकाच्या पत्नीने आरोपीला एमआयडीसी येथील बंद घराची चावी देत त्याला कुराण आणण्यास सांगितले. त्यावेळी आरोपीने याच संधीचा फायदा घेत घरातील रोख तीन लाख रुपये व सोने व हिऱ्यांचे एकूण ६८ लाख २० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून पळ काढला. नोकराने केलेल्या चोरीचा उलघडा झाल्यानंतर या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, आरोपीचा शोध लागत नव्हता. त्याने आपली ओळख लपवून तो उत्तर प्रदेश, मथुरा अशा ठिकाणी राहत होता. दरम्यान, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या कक्ष- १० च्या पोलिसांकजे वर्ग केल्यानंतर पोलीस पथकाने त्याचा शोध घेण्यासाठी सुरुवात केली. अशातच आरोपी सोन्याची विक्री करण्यासाठी विलेपार्ले परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.