बापरे! "आता मी मालक", नोकराने घरमालकाला स्वत:च्याच घरातून धक्के मारून काढलं बाहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 04:15 PM2022-11-14T16:15:41+5:302022-11-14T16:26:21+5:30
आता मी या घराचा मालक आहे असं मालकाला सांगितलं आणि हे ऐकून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली.
उत्तर प्रदेशमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. तीन महिन्यांनंतर मुंबईहून आलेल्या घर मालकाला नोकराने थेट त्याच्याच घरातून धक्के मारून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आता मी या घराचा मालक आहे असं मालकाला सांगितलं आणि हे ऐकून मालकाच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर या कुटुंबाने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत नोकरासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारती धंजल या मुंबईमध्ये आपले पती, मुलगी आणि मुलासह राहतात. इंदिरानगरच्या शक्तिनगरमध्ये त्यांचं घर आहे. ज्य़ा घरात त्यांची बहीण कुमारी विद्या सिंह राहत होत्या. पण आजारपणामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्या घरामध्ये अमित नावाचा एक नोकर होता. अनेक वर्षे काम करणारा अमित त्याच्या कुटुंबीयांसह राहत होता. त्याला वाटलं आता बहिणीच्या मृत्यूनंतर या घरात कोणी परत येणार नाही.
बहिणीच्या मृत्यूनंतर जवळपास तीन महिन्यांनी भारती धंजल आपल्या कुटुंबासह लखनौला परत आल्या. त्यावेळी घरामध्ये नोकर म्हणून काम करणाऱ्या अमितने त्यांना घरात घुसून दिलं नाही. पीडित कुटुंबाने ज्वाइंट कमिश्नर पीयूष मोर्डिया य़ांच्याकडे मदत मागितली आहे. पोलिसांनी तपास केला असता नोकराने त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने घरावर कब्जा केल्याचं समोर आलं आहे.
घरमालक असलेल्या भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या आधी त्याच घरामध्ये राहत होत्या. पण मुलांच्या लग्नानंतर त्या मुंबईमध्ये शिफ्ट झाल्या. आता घर पुन्हा परत मिळाल्याने त्या खूप खूश झाल्या आहेत. पीडित कुटुंबाने मोर्डिया यांची भेट घेऊन नोकराने आपल्या घरावर कब्जा केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर कारवाई करण्यात आली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.