उच्चभ्रू वस्तीत नोकराने मारला कोटींचा डल्ला; अखेर अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 12:54 PM2023-04-28T12:54:52+5:302023-04-28T12:55:15+5:30
मालमत्तेसह आरोपी गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गावदेवीच्या उच्चभ्रू वस्तीत नोकराने कोटींचा डल्ला मारल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी १ कोटी ७१ लाख रुपयांच्या मालमत्तेसह आरोपी मायलेन जेम्स सुरेन ऊर्फ मोना (३७) आणि अब्दुल शेख (३८) यांना अटक केली आहे.
मायलेन ही फिर्यादीच्या घरी गेल्या १० वर्षापासून काम करते. फिर्यादीच्या पत्नीने बेडरूमच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने त्यांनी १८ मार्च रोजी परिधान केले आणि पुन्हा आणून तिथेच ठेवले. मात्र महिनाभरानंतर पुन्हा जेव्हा त्या दागिने अन्य एका कार्यक्रमासाठी वापरायचे म्हणून कपाट उघडायला गेल्या, त्यावेळी त्यातून सोन्याचा आणि हिऱ्याचे दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत विचारणा केल्यावर काहीच माहीत नसल्याचा आव आणणाऱ्या मायलेननेच अधिक चौकशीमध्ये फेब्रुवारी, २०२३ पासून दागिने चोरीचे उघड झाल्यावर तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रभारी पोलिस निरीक्षक शशिकांत यादव, सहायक पोलिस निरीक्षक श्रीनिवास दराडे, धनेश सातार्डेकर आणि पथकाने तपास सुरू करून आसाममधून मायलेजच्या मुसक्या आवळल्या.
तिच्या सीडीआरच्या मदतीने जोगेश्वरी स्टेशन परिसरातून बाहेरच्या राज्यात पळण्याच्या तयारीत असलेल्या अब्दुल मुनाफ याचा गाशा गुंडाळला.
मुनाफ हा या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असून त्याचे साथीदार हसमुख बागडा हा सोने आणि हिऱ्याच्या दागिन्यांचा दलाल, नुरुद्दीन शेख व संगीता कांबळे यांनाही अटक करण्यात आली.