बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 03:14 PM2024-10-01T15:14:44+5:302024-10-01T15:21:28+5:30
नोकराने ५८ किलो चांदी चोरली. एवढी मोठी चोरी होऊनही त्याचा सुगावाही व्यापाऱ्याला नव्हता. पोलिसांमार्फत माहिती दिल्यानंतर व्यापाऱ्याला ही माहिती मिळाली.
कानपूरमधून चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. जेथे व्यापाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नोकराने ५८ किलो चांदी चोरली. एवढी मोठी चोरी होऊनही त्याचा सुगावाही व्यापाऱ्याला नव्हता. पोलिसांमार्फत माहिती दिल्यानंतर व्यापाऱ्याला ही माहिती मिळाली.
अश्विनी नावाचा व्यापारी कानपूरच्या धोबी बाजार भागात सोन्या-चांदीचा व्यवसाय करतो. अलीकडेच त्याचा एक नोकर लल्लू ५८ किलो चांदी देण्यासाठी गेला होता. याच दरम्यान, वाटेत स्कूटर सोडून चांदी घेऊन पळून गेला. नोकराने केलेल्या या चोरीची माहितीही व्यापाऱ्याला नव्हती.
कानपूर कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे ही मोठी चोरी उघडकीस आली. वास्तविक, घटनेच्या दिवशी कानपूर कोतवाली पोलीस त्याच रस्त्यावर तपासणी करत होते. तपासणीदरम्यान पोलिसांना एक स्कूटर रस्त्यावर दिसली. त्यावेळी स्कूटरसोबत कोणीही नव्हतं.
पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. घटनास्थळी स्कूटर उभी असल्याची माहिती पोलिसांनी मालकाला दिली, मात्र तरीही आपल्यासोबत एवढी मोठी घटना घडल्याचं मालकाच्या लक्षात आलं नाही. मालक अश्विनी यांनी सांगितले की, स्कूटर घेऊन जाणारा नोकर त्यांच्याकडे काम करतो.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा खुलासा
या माहितीनंतर व्यावसायिकाने चौकशी केली असता त्यांना एका नोकराच्या माध्यमातून ५८ किलो चांदी गायब झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी नोकर लल्लूला अटक केली आहे.
व्यापाऱ्याने सांगितलं की, आरोपी लल्लू गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्याकडे काम करत होता. आपला विश्वासू नोकर एवढी मोठी चोरी करेल याची आपल्याला कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.
पोलिसांनी दोन आरोपींना केली अटक
या घटनेबाबत एसीपी आशुतोष कुमार म्हणाले की, एक स्कूटर रस्त्यावर पडून असल्याचं दिसलं, तिच्या नंबरप्लेटवरून मालकाशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर चांदीसह नोकर बेपत्ता झाल्याची माहिती मालकाला नसल्याचं समोर आलं.
एसीपी आशुतोष कुमार यांनी सांगितलं की, या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि आरोपी तरुण लल्लू आणि त्याच्या अन्य साथीदाराला ५८ किलो चांदीसह अटक करण्यात आली.