सुनील धोपेकर हत्याकांडातील सात आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 11:18 AM2021-02-17T11:18:16+5:302021-02-17T11:21:20+5:30
life imprisonment to seven accused सात आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अकोला : जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातूर रोडवरील जयराज वाईन बारमध्ये सात ते आठ जणांनी यथेच्छ मद्यप्राशन व जेवण केल्यानंतर बिलाचे चार हजार रुपये न देता बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर यांच्याशी वाद घालून त्यांची हत्या करणाऱ्या सात आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या हत्याकांड प्रकरणात ८ जणांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला होता. त्यामधील सात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून एका आरोपीची निर्दोष सुटका केली. या हत्या प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने आठही आरोपींना निर्दोष सोडले होते.
पातूर रोडवरील जयराज वाईन बार येथे विवेक प्रकाश इंगळे (३३), सतीश गुलाब खंडारे (३४), सागर रामराव उपरवाट (२९), नीतेश गुलाब खंडारे (३०), कुणाल शिवचरण तायडे (३२), अक्षय मोहन घुगे (३७) व शुभम शेषराव खंडारे (३२) या आरोपींनी १३ ऑगस्ट २०१४ रोजी यथेच्छ मद्यप्राशन करून जेवण केले. त्यानंतर बिलाचे पैसे देण्यावरून वाद झाला असता आरोपींनी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशिनाथ कांबळे (४६) याला तिथे बोलावले. त्यामुळे वाद आणखी वाढला. मात्र तरीही वेटरने चार हजार रुपयांचे बिल या आरोपींना देऊन पैशाची मागणी केली असता आरोपींनी बिल न देता वेटर व वाईन बारमधील कर्मचाऱ्यांसोबत वाद सुरू केला. यावेळी वाईन बारचे व्यवस्थापक सुनील धोपेकर यांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न करून बिलाची मागणी केली. मात्र नशेत असलेल्या आरोपींनी सुनील धोपेकर यांच्यावर लोखंडी पाईप व काठीने हल्ला चढविला. यामध्ये सुनील धोपेकर यांचा मृत्यू झाला. त्यानंतर या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३०२, ३२६ तसेच विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. केदार यांच्या न्यायालयाने आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली होती; मात्र या निर्णयाविरोधात सरकार पक्षाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली. नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्या खंडपीठाने गजानन काशिनाथ कांबळे वगळता इतर सात आरोपींना सुनील धोपेकर यांच्या हत्याकांड प्रकरणात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
२०१८ मध्ये सुटले होते निर्दोष
सुनील धोपेकर हत्याकांडातील आरोपी ५ मार्च २०१८ रोजी सत्र न्यायालयाने ठोस पुरावे नसल्याचे कारणावरून सर्वांना निर्दोष सोडले होते. त्या निर्णयाविरुद्ध राज्य सरकारने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने विविध कायदेशीर बाबी लक्षात घेता हा सुधारित निर्णय दिला. राज्य सरकारच्या वतीने ॲड. तहसीन मिर्झा यांनी कामकाज पाहिले.
अशी घडली घटना
१२ ऑगस्ट २०१४ रोजी आरोपी सतीश खंडारे, उपरवाट व इतर चार जणांनी जयराज बारमध्ये ४ हजार रुपयांची दारू व खाद्य पदार्थ खरेदी केले. त्यानंतर आरोपींनी लगेच बिल देण्यास नकार दिला. रक्कम उधार ठेवण्यास सांगितले. त्यावरून मयत सुनील धाेपेकर व इतर बार कर्मचाऱ्यांचा आरोपींसोबत वाद झाला. दरम्यान, आरोपीनी धोपेकर यांना पाहून घेण्याची धमकी देऊन निघून गेले. त्यानंतर १३ ऑगस्ट रोजी आरोपींनी सुनील धाेपेकर यांना लोखंडी पाईप व काठ्यांनी जबर मारहाण केली. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरोपींना एकूण ५ लाख रुपये दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम मयताच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून अदा करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले. त्यामुळे सुनील धोपेकर यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत होणार आहे.