मुंबईतील सात कुंटणखान्याना टाळे; सेक्स रॅकेट विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 06:36 PM2023-10-12T18:36:32+5:302023-10-12T18:36:47+5:30
३३ महिलांची केली होती सुटका; सेक्स रॅकेट विरोधात मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी शाळेच्या आवारालगत असलेल्या सात कुंटणखान्यावर कारवाई करत गुन्हे शाखेने ३३ महिलांची सुटका केली. याच कारवाईत पाठपुरावा करत, या कुंटणखान्याना दोन महिने बंद ठेवण्याचे आदेश गुरुवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहे. अशाप्रकारे सेक्स रॅकेट विरोधात मुंबई पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी ७ जुलै रोजी गिरगाव येथील व्हि. पी. रोड, नूर मोहमद बेग मोहमद कंपाउड या भागात एका शाळेपासून दोनशे मीटरच्या अंतरावर सुरु असलेल्या कुंटणखान्यावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, अंमलबजावणीने कारवाई केली. या कारवाईत ७ वेगवेगळ्या रूमची झाडाझडती घेत, ३३ महिलांची सुटका करण्यात आली. २४ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली. याठिकाणी पुन्हा सेक्स रॅकेट सुरु होऊ नये म्हणून अंमलबजावणी कक्षाने या कुंटणखाना बंद करण्याबाबत आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला.
याच प्रस्तावावर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, यांनी अंतीम सुनावणी घेवून कुंटणखाना चालक / मालक व त्यांचे वकील यांची बाजू ऐकून ७ ही कुंटणखाने २ महिन्याकरीता बंद करण्याचे आदेश दिले आहे. अशा प्रकारे ३३ महिलांची देहविकीतून सुटका करून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेत असलेल्या या ठिकाणांनाच बंद करण्यास अंमलबजावणी कक्षाला यश आले आहे.