विदेशी तरुणाकडून सात लाखांचे कोकेन जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 03:59 PM2018-08-26T15:59:49+5:302018-08-26T16:00:42+5:30
तब्बल सात लाख रुपयांचे बेकायदा कोकेन बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी तरुणाला जेरबंद केले आहे.
पुणे : तब्बल सात लाख रुपयांचे बेकायदा कोकेन बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका विदेशी तरुणाला जेरबंद केले आहे. त्याच्याकडून कोकेन, वजन काटा, रोकड आणि मोबाईल असा एकूण सात लाख 38 हजार 120 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास गुलटेकडी येथील सॅलिसबरी पार्क येथे करण्यात आली.
अॅन्टोनी मॅक्सवेल ऊर्फ ऊगुचूकू इमॅन्यूएल (वय 35, रा. मंत्री इस्टेट मागे, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो मुळचा नायजेरीयाचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अॅन्टोनी हा अंमली पदार्थांची तस्करी करीत असल्याची माहिती पोलीस हवालदार शैलेश जगताप व सहायक फौजदार अविनाश शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करीत सापळा रचून आरोपीला जेरबंद करण्यात आले. त्याच्याकडून कोकेनसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमध्ये हवालदार शैलेश जगताप, सहायक फौजदार अविनाश शिंदे, मुशर्रफ पठाण, बाबा शिर्के, हेमा ढेबे, साबळे यांनी भाग घेतला. याप्रकरणी शिंदे यांनी फिर्याद दिली आहे.
त्याचा पासपोर्ट ताब्यात घेण्यात आला असून अॅन्टोनी हा टुरिस्ट (पर्यटन) व्हिसावर भारतामध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. पुढील तपास सुरु आहे.