एटीएसकडून आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट उद्ध्वस्त, सात जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 06:08 AM2019-08-11T06:08:50+5:302019-08-11T06:09:01+5:30

मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे.

Seven people arrested by ATS over illegal racket of international telephone exchange | एटीएसकडून आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट उद्ध्वस्त, सात जणांना अटक

एटीएसकडून आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट उद्ध्वस्त, सात जणांना अटक

Next

मुंबई : मुंबईतून चालविण्यात येणारे आंतरराष्ट्रीय टेलिफोन एक्स्चेंजचे अवैध रॅकेट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) उद्ध्वस्त करत सात जणांना अटक केली आहे. या टोळीने गेल्या सहा महिन्यांत शासनाची तब्बल ३७ कोटी ५० लाखांची फसवणूक केली आहे. आरोपींकडे पोलीस अधिक तपास करत आहेत.

नाझीम खान (२९), फैजल बाटलीवाला उर्फ अकबर (४०), समीर दरवेज (३०), हुसैन सय्यद (३९), मंदार आचरेकर (३६), सिब्तेन मर्चंट (३३) आणि इम्तियाज शेख (३८) अशी अटक आरोपींची नावे आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून आरोपी हे रॅकेट चालवत असल्याचे तपासात समोर आले.

गोवंडीतील शिवाजीनगरमधून इंटरनेट सर्व्हिस पुरविणाऱ्याच्या माध्यमातून एक अनधिकृत टेलिफोन एक्स्चेंज सेंटर सुरू असल्याची माहिती मिळताच एटीएसने तपास सुरू केला. एटीएसप्रमुख देवेन भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सात पथके नेमण्यात आली. पथकाने तपास करत शिवाजीनगरसह मुंबईतील मस्जीद बंदर, डोंगरी, वरळी तर कल्याण आणि नवीन पनवेलमध्ये छापेमारी करत कारवाई केली. त्यात गोवंडीत याचे मुख्य सर्व्हर असल्याचे समोर आले.
हे रॅकेट विदेशातून इंटरनेटच्या माध्यमातून आलेल्या ग्राहकाचा कॉल व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करायचे. तो कॉल आरोपी आपल्याकडील सिमकार्डच्या माध्यमातून भारतातील त्या संबंधित व्यक्तीला जोडून देत. यासाठी ते इंटरनेट प्रोटोकॉल आणि पीआरआय लाइन्सचादेखील वापर करत होते. यामुळे दूरसंचार विभागासोबतच मोबाइल कंपन्यांचीही मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. तसेच आरोपी वेगवेगळी सिमकार्ड वापरत असल्याने आणि विदेशातून इंटरनेट कॉल आल्याने कॉल करणाºया व्यक्तीबद्दल काहीच माहिती किंवा रेकॉर्ड भारतीय यंत्रणा, मोबाइल कंपन्यांकडे मिळू शकत नव्हता. याचाच फायदा घेत या टोळीने हे रॅकेट मोठ्या प्रमाणात सुरू ठेवले असून यातील एका आरोपीला याआधीही अशाच गुन्ह्यात अटक करण्यात आल्याचे एटीएसच्या तपासात समोर आले आहे.

३७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान
यूएई, कतार, बहरीन आणि कुवेत अशा आखाती देशांतून येणारे इंटरनेट कॉल या टेलिकॉम एक्स्चेंजच्या माध्यमातून व्हॉइस कॉलमध्ये रूपांतरित करून भारत सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाचे ३७ कोटी ५० लाख रुपयांचे नुकसान करण्यात आल्याचे उघड झाले आहे.

५१३ सिमकार्ड जप्त
आरोपींकडून मुख्य सर्वर, ९ सिम बॉक्स, ५१३ सिमकार्ड, ३ लॅपटॉप, ४ डेक्सटॉप, ७ वायफाय राऊटर, २ इंटरनेट टर्मिनेटिंग स्विच आणि ११ मोबाइल असा एकूण ६ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

यापूर्वीच्या कारवाया
भारतीय लष्कर तळांची आणि देशातील गुप्त माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तानच्या आयएसआयकडून वापरण्यात येणाºया अवैध दूरसंचार यंत्रणेवर महाराष्ट्र एटीएसने २०१७ मध्ये कारवाई करत राज्यातील १२ केंद्रे उद्ध्वस्त केली होती. लातूरसह राज्यभरात आणि हैदराबादमध्ये अवैधरीत्या चालविण्यात येणाºया टेलिफोन एक्स्चेंज रॅकेट उद्ध्वस्त केले. एटीएसने या प्रकरणात शंकर बिरादार (३३) आणि रवी साबडे (२७) यांना अटक केली. त्यापाठोपाठ मुंबईतील गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर आणि ट्रॉम्बे परिसरात सुरू असलेल्या टेलिफोन एक्स्चेंजचा पर्दाफाश केला. यात नूरमोहम्मद अश्रफ शेख, नासीर हुसैन कादीर हुसैन शेख, नाझीम मोहम्मद नसीम खान, शम्स आलम शेख आणि शाहिद जमाल जमालउद्दीन झाकी यांना अटक केली.

Web Title: Seven people arrested by ATS over illegal racket of international telephone exchange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.