वन कर्मचाऱ्यावरील हल्ला प्रकरणी सात जणांना अटक, ज्ञानगंगा अभयारण्यातील घटना
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 25, 2022 10:30 PM2022-09-25T22:30:41+5:302022-09-25T22:31:11+5:30
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे संरक्षित व प्रतिबंधित क्षेत्र आहे.
बुलढाणा : ज्ञानगंगा अभयारण्यातील लोखंड नाल्यातून अवैधरित्य रेतीचा उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरला पकडून कारवाई करत असताना कोथळी येथील युसुफ डॉनसह त्याच्या साथीदारांनी वन्यजीव कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना शनिवारी घडली. यात तीन कर्मचारी जखमी झाले होते. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी रविवारी सात आरोपींना अटक केली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्य हे संरक्षित व प्रतिबंधित क्षेत्र आहे. दरम्यान, २४ सप्टेंबरला वनरक्षक सिद्धेश्वर पाटील आपल्या सहकाऱ्यांसह खामगाव रेंजमधील पिंपळगाव नाथ बीटमध्ये गस्त घालीत होते. यावेळी लोखंडा नाल्यातून ट्रॅक्टरद्वारे रेती उपसा केल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ट्रॅक्टर ताब्यात घेत पुढील कारवाई करत असतानाच, कोथळी येथील युसुफ डॉन म्हणून ट्रॅक्टर मालक त्या ठिकाणी पोहोचला व त्याच्यासह इतर व्यक्तींनी लाठ्या-काठ्यांनी वन कर्मचाऱ्यावर हल्ला चढविला.
हल्ला करून त्यांनी ट्रॅक्टर पळवून नेले. या हल्ल्यात वनरक्षक सिद्धेश्वर कारभारी पाटील, वनमजुर ज्ञानेश्वर पुंजाजी सोनूने व ज्ञानसिंग मोहनसिंग पडवाल हे तिघे जखमी झाले आहेत. या प्रकरणी बोराखेडी ठाण्यात आरोपी सुभाष वसंता गाडेकर, रशीद, आरीफ, मेजवान, युसुफ खाँ व इतर दोन अनोळखी व्यक्तींवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी
ज्ञानगंगा अभयारण्यात वन कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या या घटनेने वन विभागाच्या वर्तूळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीसांनी आरोंनीपा अटक करून न्यायालय समोर हजर केले असता त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.