मुंबईत १ कोटी ९ लाखांची रोकड जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 05:21 IST2019-04-19T14:04:12+5:302019-04-20T05:21:12+5:30
निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने गुरुवारी आणि शुक्रवारी एकूण १ कोटी ९ लाखांची रक्कम जप्त केली आहे

मुंबईत १ कोटी ९ लाखांची रोकड जप्त
मुंबई : निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने गुरुवारी आणि शुक्रवारी एकूण १ कोटी ९ लाखांची रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी आयकर विभागाकडून चौकशी सुरू आहे.
घाटकोपर पूर्वेकडील मॉल परिसरालगत वाहनांची तपासणी सुरू असताना, शुक्रवारी अक्षय शहा (२२) याच्या कारमधून ३४ लाखांची रोकड जप्त केली गेली. भंगार विक्रीच्या व्यवहारातील ती रक्कम असल्याचे शहाचे म्हणणे आहे. एसएसटी क्रमांक १ चे पथक प्रमुख दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. या रकमेबाबत आयकर विभाग अधिक तपास करीत आहे. या रकमेचे राजकीय कनेक्शन आहे का? त्या संबंधित कागदपत्रांबाबत ते कसून चौकशी करीत आहेत.
तर, मुंबई शहर जिल्ह्यात गुरुवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने ७५ लाख रुपयांची संशयित रक्कम पकडली. गुरुवारी मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील गोल देऊळ एस.व्ही.पी. रोड स्थिर तपासणी पथकाने एका हुन्दई कारची तपासणी केली. या गाडीमध्ये प्रदीप निसार, शांतीलाल निसार आणि महेश गाला यांच्याकडे १० लाखांची रोकड सापडली.
तसेच भायखळा येथील तांबीट नाका येथे स्थिर तपासणी पथकाने एका गाडीची तपासणी केली असता, गाडीत एकूण ४९ लाख ९८ हजार ५०० रुपयांची रक्कम आढळून आली. तर राणीबागेजवळ एका ईको स्पोर्ट्स फोर्डच्या तपासणीत १५ लाखांची रक्कम पथकाने जप्त केली. या तीनही प्रकरणांबाबत आयकर विभागाडून अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बन्सी गवळी यांनी दिली.