सात वर्षांच्या ‘नाजूक’ हातांना बारा तास काम!, माझगाव येथील बॅग कारखान्यात छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 11:39 AM2023-08-29T11:39:16+5:302023-08-29T11:40:21+5:30
सरकारी कामगार अधिकारी भरत शेर्लेकर (५४) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे.
मुंबई : माझगाव, दारूखाना येथील एका बॅग बनविण्याच्या कारखान्यातून ७ ते १६ वयोगटातील १३ मुलांची सुटका केली आहे. मुलांच्या गरिबीचा फायदा घेत त्यांचे मानसिक, शारीरिक छळ करत जास्तीचे अंगमेहनतीची कामे करून घेण्यात येत होती.
याप्रकरणी शिवडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवत कारखाना मालकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये सात वर्षांचा मुलगाही पोलिसांच्या हाती लागला. त्यांच्याकडून १० ते १२ तास काम करून घेण्यात येत होती.
सरकारी कामगार अधिकारी भरत शेर्लेकर (५४) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई केली आहे. विशेष बाल पोलिस कक्षातील अधिकाऱ्यांना याबाबत माहिती मिळताच, सरकारी कामगार अधिकारी आणि संस्थेच्या प्रतिनिधींसह त्यांनी या कारखान्यात छापा टाकला.
यावेळी अल्पवयीन मुले बॅगेचे काम करताना दिसून आले. कमी मोबदल्यात या मुलांकडून जास्तीचे कामे करून घेतली जात होती. यामध्ये एक सात वर्षांचा मुलगाही पोलिसांच्या हाती लागला. बिहारमधून या मुलांना कामासाठी येथे आणले होते.
या मुलांकडून १० ते १२ तास काम करून घेतले जात होते. मुलांना वेळेवर जेवणही मिळत नव्हते. कारखाना मालक गौस मोहम्मद फराज मेहबूब अन्सारी (२६) याच्यावर कारवाई केली आहे. या मुलांची बाल सुधारगृहात रवानगी केली.