लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला सात वर्षांची शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 07:10 AM2020-01-21T07:10:34+5:302020-01-21T07:10:50+5:30
लग्नाचे प्रलोभन दाखवून एका मागासवर्गीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणा-या नवीनकुमार प्रेमशंकर तिवारी (३१) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा शनिवारी ठोठावली आहे.
ठाणे : लग्नाचे प्रलोभन दाखवून एका मागासवर्गीय तरुणीवर लैंगिक अत्याचार करणा-या नवीनकुमार प्रेमशंकर तिवारी (३१) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा शनिवारी ठोठावली आहे. अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही एका वर्षाच्या कारावासाची तसेच ३५ हजारांच्या दंडाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.
रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील रहिवासी नवीनकुमार याचे मागासवर्गीय युवतीसोबत पाच वर्षांपूर्वी प्रेम जुळले होते. हे दोघेही कुर्ला येथील एका कॅटरिंगमध्ये काम करीत होते. तिथेच त्याने तिला लग्नाचे आमिष दाखवून मुंब्रा कॉलनी येथील एका भाड्याच्या घरात ठेवले. पती-पत्नीप्रमाणे वास्तव्य करून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले.
त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. प्रत्यक्ष लग्नाचे नाव तिने काढल्यानंतर मात्र तो तिला टाळाटाळ करीत होता. तेंव्हा तिने त्याच्या खोपोली येथील घरी जाऊन त्याच्या आईवडिलांकडे आपली कैफियत मांडली. त्यांनीही उच्चवर्णीय असल्यामुळे तिच्याशी मुलाचे लग्न लावून देण्यात असमर्थता दर्शविली. अखेर तिने या प्रकरणी राज्य महिला आयोगाकडे नवीनकुमारसह त्याच्या आईवडिलांविरुद्ध तक्रार केली. आयोगाने हे प्रकरण मुंब्रा पोलिसांकडे वर्ग केले. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी २०१४ मध्येच तिघांनाही अटक केली. त्यानंतर या प्रकरणी ठाणे सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते.
न्यायालयाने केली आईवडिलांची निर्दोष मुक्तता
या खटल्याची १८ जानेवारी २०२० रोजी अंतिम सुनावणी झाली. सरकारी वकील रेखा हिवराळे यांनी आरोपीस कडक शिक्षा करण्यासाठी जोरदार बाजू मांडली. सर्व साक्षी-पुरावे तसेच मुंब्रा पोलिसांनी केलेल्या तपासाच्या आधारावर ठाण्याचे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश जी.पी. शिरसाट यांनी साक्षी-पुरावे ग्राह्य मानून नवीनकुमार याला लैंगिक अत्याचार कलम ३७६ अंतर्गत सात वर्षे कारावास आणि ३० हजार रुपये दंडाची शिक्षा तसेच अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत एक वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडामधील ३० हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्याच्या आईवडिलांची यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या या लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे या खटल्याकडे न्यायालयातील वकील, पोलीस आणि पीडितेच्या नातेवाइकांचे लक्ष लागले होते.