सातवीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाची बेदम मारहाण; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2020 10:53 PM2020-03-08T22:53:09+5:302020-03-08T22:54:07+5:30
शाळेच्या मुख्याध्यापकांसमोरच हा प्रकार घडला. मारहाण करणाºया शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी मारहाणीस उत्तेजन दिले.
जव्हार : जिल्हा परिषद शाळेतील इ.७ वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून बेदम मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या शिक्षकाला तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी श्रमजीवी संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे.
जव्हार तालुक्यातील न्याहाळे बु जिल्हा परिषद शाळेतील ७ शिकणारा १३ वर्षीय जयेश संतोष वाजे हा शुक्रवारी मधल्या सुटीच्या दरम्यान फुटबॉल खेळत असताना त्या शाळेचे शिक्षक मिलिंद नंदालाल मेश्राम यांनी जयेश वाजेला वर्गात खेचत नेऊन डोक्याच्या केसांना पकडून, लादीवर आदळून बेदम मारहाण केली. या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याने शाळेत भीतीचे वातावरण आहे. म्हणून जिल्हा परिषद शाळेत गळतीचे प्रमाण अधिक आहे. तरी त्या शिक्षकाला तात्काळ सेवेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यांच्यावर जव्हार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जव्हार तालुका हा आदिवासी भाग असल्याने, बहुतांश जि.प. शाळेत गरिबातील गरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गरिबीचा फायदा घेत शिक्षकवर्ग अतिरेक करीत आहेत. आदिवासी भागात विद्यार्थ्यांना मारहाणीचे असे प्रकार या जिल्हा परिषद शाळेत नेहमीच प्रकार घडल्याचे काहींनी सांगितले.
अन्यथा आंदोलन
शाळेच्या मुख्याध्यापकांसमोरच हा प्रकार घडला. मारहाण करणाºया शिक्षकावर कारवाई करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी मारहाणीस उत्तेजन दिले. मुख्याध्यापकांनाही निलंबित करण्यात यावे, अन्यथा श्रमजीवी संघटना आंदोलन करणार आहे, असे संघटनेचे जव्हार तालुका सचिव संतोष धिंडा यांनी सांगितले.