महिला सरपंचाच्या निवासस्थानी देहव्यापार अड्डा; दोन युवतींसह ग्राहक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 01:34 PM2018-07-22T13:34:17+5:302018-07-22T13:40:14+5:30
अकोला: शहरालगतच्या गावातील महिलेच्या निवासस्थानी सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर अकोला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला.
अकोला: शहरालगतच्या गावातील महिलेच्या निवासस्थानी सुरू असलेल्या देहव्यापाराच्या अड्ड्यावर अकोला पोलिसांनी शनिवारी सायंकाळी छापा टाकला. यावेळी महिलेच्या निवासस्थानामधून दोन युवती व मेहकर येथील ग्राहकांना पोलिसांनी रंगेहात अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांना शहरालगतच्या गावात एका महिलेच्या निवासस्थानी युवतींना आणून देहव्यापाराचा अड्डा चालविल्या जात असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा, मूर्तिजापूर व बार्शीटाकळी पोलिसांचे पथक गठित करण्यात आले. त्यानंतर या पथकाने एक बनावट ग्राहक तयार करून त्याला गावातील दलाल सुनील नामदेव सरकटे याच्याकडे शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास पाठविले. मुलीसोबत राहण्याचा दीड हजार रुपयांमध्ये व्यवहार ठरला. त्यानंतर बनावट ग्राहक व दलाल सुनील सरकटे हे दोघे त्या महिलेच्या निवासस्थानी गेले. तेथे दोन युवती होत्या. ग्राहक व दलाल अचानक निवासस्थानी गेल्याने तेथे आधीच उपस्थित असलेले मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ओमप्रकाश ऊर्फ सचिन विश्वासराव सवडतकर (३४) श्रीकिसन सुखदेव पवार (३६) नको त्या अवस्थेत दिसून आले. बनावट ग्राहकाने दबा धरून बसलेल्या पोलिसांना इशारा करताच पोलिसांनी घरात छापा टाकला. दलालाकडून ४ हजार रुपये जप्त केले. गावातील कुंटणखाना संबंधित महिला चालवत असल्याची कबुली दलालाने पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्यासह दोन ग्राहक व महिलेविरुद्ध भादंवि कलम ४,५, ५(१)(सी) ९ अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दोन ग्राहक व दलाल या तिघांना यावेळी अटक केली, तर पीडित युवतींची रवानगी सुधारगृहात केली.
देहव्यापाराचे मुंबई-पुण्यात धागेदोरे
देहव्यापारात त्या महिलेचा मोठा हातखंडा असल्याची माहिती समोर आली आहे. तिच्याकडे येणारे ग्राहक व मुली मुंबई, पुणे, नागपूरमधील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही मुली नागपूरमधील असल्याची माहिती असून, त्यांना ग्राहकांच्या डिमांडनुसार बोलावण्यात येते.