सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, तीन पीडित तरुणींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 01:35 AM2020-10-30T01:35:23+5:302020-10-30T01:36:06+5:30
Crime News : एका इमारतीतील घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर मंगळवारी रात्री छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.
नालासोपारा : विरारच्या पश्चिमेकडील असलेल्या ग्लोबल सिटीमधील एका इमारतीतील घरात चालणाऱ्या वेश्या व्यवसायावर मंगळवारी रात्री छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी तीन पीडित तरुणींची सुटका करून दोन आरोपींविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीमधील महावीर गार्डन इमारतीमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास दोन हजार रुपये देऊन बोगस गिऱ्हाईक सदनिका नंबर ५०१ मध्ये पाठवले.
पोलिसांना खात्री झाल्यावर सदर ठिकाणी अनैतिक मानवी वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे, अमोल बोरकर, महेश यशवंत गोसावी, बी.एम. पवार, श्याम शिंदे किणी, कांटेला, डोईफोडे, जगदाळे यांनी छापा टाकून आरोपींकडून बोगस गिऱ्हाइकाने दिलेले दोन हजार रुपये स्वीकारल्याचे आढळून आले. पोलिसांनी नालासोपारा आणि नायगाव परिसरात राहणाऱ्या आणि एका बंद घरात ठेवलेल्या १९ ते २५ वयोगटांतील तीन पीडित तरुणींची सुटका करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
आरोपी शांताराम बाणे (४२) आणि दर्शना दयानंद बाणे (२७) या दोघांनी पीडित तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्यागमनाकरिता प्रवृत्त केल्याचे आढळून आले म्हणून अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.