ठाण्यात थाई मुलींकडून सेक्स रॅकेट: विदेशी महिलेकडे भारतीय आधार आणि पॅनकार्ड
By जितेंद्र कालेकर | Published: June 26, 2024 08:27 PM2024-06-26T20:27:30+5:302024-06-26T20:27:47+5:30
ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई: पॅनकार्ड पुरविणाऱ्याला पुण्यातून अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: थायलंडच्या तरुणींचा २५ हजारांमध्ये सौदा होत असल्याचे उघड केल्यानंतर यातील विदेशी दलाल महिलेला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने नुकतीच अटक केली. तिच्या तावडीतून तीन विदेशी पिडित मुलींची सुटका केली. याच चौकशीमध्ये विदेशी महिलेला भारतीय पॅनकार्ड आणि आधारकार्ड पुरविणाऱ्या बागडी अब्दुलाह साद (रा. पुणे, मुळ रा. येमेन देश) यालाही अटक केल्याची माहिती पोलिस उपायुक्त शिवराज पाटील यांनी बुधवारी दिली.
या सेक्स रॅकेट प्रकरणामध्ये अटक केलेल्या थायलंड देशाच्या दलाल महिलेकडे थायलंडचा पासपोर्ट तसेच बागडी याच्याकडे येमेन देशाचा मुदत संपलेला पासपोर्ट आणि व्हिजा मिळाला आहे. ते दोघेही विनापरवाना भारतात वास्तव्य करीत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यासह भारतीय पारपत्र कायद्याखालीही गुन्हा दाखल झाला आहे. मुळचा येमेन देशातील बागडी आणि विदेशी तरुणींच्या मदतीने शरीर विक्रयाचा व्यवसाय चालविणारी दलाल महिला यांची ओळख नेमकी कशी झाली? त्याने तिला कोणाच्या मदतीने भारतीय आधारकार्ड आणि पॅनकार्ड पुरविले, याचा तपास आता अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाकडून केला जात आहे. विदेशी तरुणींना अशा प्रकारे बनावट कागदपत्रे तयार करुन देणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक वनिता पाटील या अधिक तपास करीत आहेत.
अशी झाली कारवाई-
ठाणे शहर परिसरात तसेच मुंबई, लोणावळा, गोवा अशा वेगवेगळया ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून थायलंडसारख्या देशातील मुली आणि महिलांना फूस लावून काही गिऱ्हाईकांकडे पाठविले जात असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच आधारे सामाजिक कार्येकर्ते बिनू वर्गीस यांच्या मदतीने वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चौधरी यांच्या पथकाने २१ जून २०२४ रोजी ठाण्यातील लुईसवाडीतील एका हॉटेलमध्ये छापा टाकून थायलंडच्या दलाल महिलेला अटक केली. तिच्या तावडीतून तीन थायलंडच्या मुलींची सुटका केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.