वेटर्सच्या नावाखाली चालवलं जात होतं सेक्स रॅकेट; ४० जणींची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 05:44 PM2019-11-22T17:44:35+5:302019-11-22T17:48:20+5:30
एपीएमसीमधल्या मॅफ्को मार्केटमध्ये ब्लू स्टार हॉटेलवर छापा टाकला.
नवी मुंबई - नवी मुंबईतील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एका हॉटेलवर छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा घालून ४० जणींची सुटका केली. एका सामाजिक संस्थेने (एनजीओ) नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार यांना या सेक्स रॅकेटबद्दल माहिती दिली होती. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने एपीएमसीमधल्या मॅफ्को मार्केटमध्ये ब्लू स्टार हॉटेलवर छापा टाकला.
ग्राहकाने केलेल्या मागणूनूसार हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी एका मुलीला जवळच्याच प्रिन्स लॉजमध्ये पाठवायचं कबूल केलं. त्यासाठी त्या ग्राहकाला ५ हजार रुपये मोजावे लागले. हे पैसे दिल्यानंतर ग्राहक लॉजमध्ये गेला त्यावेळी एक मुलगी तिथे वाट पाहत असल्याचे उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांनी ब्लू स्टार हॉटेलच्या दोन व्यवस्थापकांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर दोन कॅशियर आणि एका वेटरलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
छापा टाकून पोलिसांनी ४० जणांची सुटका केली. त्यात एक १७ वर्षीय मुलगी देखील पोलिसांना आढळून आली. दरम्यान, या हॉटेलमध्ये काम करत असलेल्या आणखी काही वेटर्ससुद्धा सेक्स वर्कर म्हणून काम करत असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी त्यानंतर तेथील बारवर देखील छापा टाकला आणि 39 महिलांची सुटका करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.