इन्स्टावर फेक अकाउंटवरून मुलींना फसवून सेक्सटॉर्शन; आरोपीला गुजरातमधून पोलिसांनी घातल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 10:41 AM2023-08-06T10:41:23+5:302023-08-06T10:41:31+5:30
पीडिता कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत असून तिचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. इन्स्टाग्राम ॲपवर तिची ओळख सनी सिंग रॉकी याच्यासोबत झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवर फेक आयडी बनवून अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे सेक्सटॉर्शन करणाऱ्या हरीओम गौतम (२१) या आरोपीला गुजरातमधून अटक करण्यात आली. गावदेवी पोलिसांनी ही कारवाई केली.
पीडिता कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत असून तिचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे. इन्स्टाग्राम ॲपवर तिची ओळख सनी सिंग रॉकी याच्यासोबत झाली. पीडिता रॉकी याच्याशी चॅट करायची. त्याचा फायदा घेत त्याने पीडितेचा विश्वास संपादन करून तिचा इन्स्टाग्राम अकाउंट पासवर्ड हॅक केला. त्यानंतर तो पासवर्ड स्वत: वापरून पीडितेचे इन्स्टाग्राम अकाउंटदेखील वापरू लागला. आरोपी तिच्याशी संभाषण करताना त्यांचे इन्स्टाग्राम चॅट संभाषणाची व्हिडीओ रेकॉर्डिंग करायचा आणि तिची काही आक्षेपार्ह फोटोही त्याने संग्रहित करून ठेवले.
हे फोटो आणि व्हिडीओ त्याने पीडितेच्या हॅक केलेल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. याप्रकरणी गावदेवी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक विवेक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कविता सुतार, सहायक पोलिस निरीक्षक धनेश सातार्डेकर आणि त्यांच्या पथकाने केला. संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटची तपासणी केली असता ते फेक तसेच फोटोही खोटा असल्याचे दिसून आले. अखेर त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या आयपी ॲड्रेसची तपासणी केली आणि तांत्रिक विश्लेषण करत त्यामार्फत चार ते पाच मोबाइल क्रमांक मिळवले. त्याचा पत्ता अहमदाबादचा निघाला.
अन्य मुलींसोबतही अश्लील संभाषण!
आरोपीला ताब्यात घेतल्यावर त्याचा मोबाइल सावर्डेकर यांनी हस्तगत केला. त्याची अधिक तपासणी केली असता त्यात फिर्यादीसह इतर काही मुलींबरोबरचेही अश्लील संभाषण त्यांना आढळले. त्यामुळे आरोपीला स्थानिक निकोल पोलिस स्टेशनमध्ये नेले. त्याला पुढील कारवाईसाठी गावदेवी पोलिस ठाण्यात आणण्यात आले.