तरुणीनं व्यापाऱ्याला Video Call वर दाखवल्या अदा अन् भुलवलं, मग वसुल केले २ कोटी ८८ लाख रुपये!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:50 PM2023-01-12T19:50:24+5:302023-01-12T19:51:33+5:30
गुजरातच्या अहमदाबादमध्ये सेक्सटॉर्शनची खळबळजनक घटना समोर आली आहे.
अहमदाबाद
गुजरातच्या अहमदाबादमध्ये सेक्सटॉर्शनची खळबळजनक घटना समोर आली आहे. व्हिडिओ कॉलवर सेक्स करण्याच्या नावावर एका महिलेनं व्यापाऱ्याला २.८८ कोटी रुपयांना लुटलं. ब्लॅकमेलिंगची ही घटना महिला आणि तिच्या सहकाऱ्यांनी आपण पोलीस, सायबर क्राइम आणि सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून केली आहे.
अहमदाबादच्या नवरंगपुराचे रहिवासी असलेल्या एका व्यापाऱ्यानं पोलिसात तक्रार दाखल केली की ८ ऑगस्ट २०२२ रोजी तो राहत्या घरात होता. त्यावेळी त्याच्या मोबाइलवर Hi असा मेसेज आला. मेसेज करणाऱ्या महिलेनं सांगितलं की ती मोरबीची आहे. त्यानंतर तिनं व्हिडिओ कॉल देखील केला.
व्हिडिओ कॉलवर व्हर्च्युअल सेक्स करण्यास सांगितलं आणि तिच्या सांगण्यानुसार व्यापाऱ्यानं कपडे देखील काढले. आपल्या बोलण्यात तिनं व्यापाऱ्याला गुंगवलं आणि मग व्हिडिओ कॉल कट केला. थोड्या वेळानं व्हिडिओ कॉलची क्लिप महिलेनं व्यापाऱ्याला व्हॉट्सअॅपवर पाठवली आणि ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिनं सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली. व्यापाऱ्यानं बदनामी होऊ नये म्हणून ५० हजार रुपये पाठवले देखील.
व्यापाऱ्याला वाटलं आता संबंधित महिलेचा काही त्रास होणार नाही. पण एकदा एका अनोळख्या व्यक्तीनं स्वत:ला दिल्ली पोलिसातील अधिकारी असल्याचं सांगत धमकी देत ३ लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर आणखी एकानं दिल्ली पोलिसांतील सायबर क्राइमचा अधिकारी असल्याचं सांगत थेट ८० लाख रुपये मागितले. ज्या महिलेसी तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोललात तिनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुमचं नाव या प्रकरणातून काढून टाकायचं असेल तर ८० लाख रुपये पाठवा असं तोतया अधिकाऱ्यानं व्यापाऱ्याला सांगितलं.
सायबर क्राइमनंतर खोट्या सीबीआय अधिकाऱ्यांची एन्ट्री झाली. स्वत:ला सीबीआय अधिकारी असल्याचं सांगून एकानं संबंधित महिला तिच्या कुटुंबीयांसोबत तक्रार दाखल करायला आली असल्याचं सांगितलं. तक्रार दाखल करुन घ्यायची नसेल तर १८ लाख रुपये द्यावे लागतील असं सांगितलं. अशापद्धतीनं आतापर्यंत व्यापाऱ्याकडून एकूण २ कोटी ८८ लाख रुपये लाटले गेले.
व्यापारी यानंतर स्वत:हून पोलिसांकडे गेला आणि सारी कहाणी सांगितली. अहमदाबाद सायबर क्राइमनं तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित व्यापाऱ्याच्या फोनवर आलेल्या मोबाइल नंबरची चौकशी केली. त्यानंतर एकाला राजस्थानच्या भरतपूर येथून अटक केली. सायबर क्राइमनं दिलेल्या माहितीनुसार याच व्यक्तीनं २ कोटी रुपये व्यापाऱ्याकडून लूटले आहेत.