सेक्सटॉर्शन! सोशल मिडियावरुन मधाळ जाळयात ओढून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 08:14 PM2021-07-29T20:14:08+5:302021-07-29T20:16:35+5:30
Sextortion Case : २५० जणांच्या अश्लील व्हिडीओची विक्री, ५ जणांवर कारवाई
मुंबई : सोशल मीडियावरुन ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. पुढे व्हॉट्सअप क्रमांक शेअर होताच तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ कॉल आला. अश्लील संवाद रंगला. आणि तरुणीच्या मधाळ जाळयात तोही विवस्त्र झाला. पुढे याच व्हिडीओ कॉलचे रेकॉर्डिंग सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळणाऱ्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यात ५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या मंडळीनी २५० हून अधिक जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना विकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात देशभरातील उच्चभ्रू तसेच उच्च शिक्षित मंडळी त्यांच्या जाळयात अडकली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अशाच प्रकारे फसवणूक करणाऱ्या मंडळीच्या तक्रारी वाढत होत्या. या मंडळीनी फसवणूकिसाठी मुलींच्या नावे ट्वीटरची ५, इंस्टाग्रामची ४ आणि फेसबुकवर ३ असे एकूण १२ फेक अकाउंट उघडले होते.
आता पर्यंत या टोळीने राज्यभरात २५० जणांचे अश्लील व्हिडीओ वेगवेगळ्या राज्यांमध्ये ८० पेक्षा जास्त लोकांना नाममात्र किंमतीत विक्री केल्याचे दिसून आले. याची विक्री करताना स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्यांनी टेलिग्रामचा वापर केला. याप्रकरणात महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि ओडिशातील ५ जणांवर कारवाई केली. यात एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असून अधिक तपास सुरु आहे. आरोपीकड़ून ६ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे.
नेपाळ कनेक्शन...
आरोपींनी सेक्सटॉर्शनद्वारे मिळणारी रक्कम
स्विकारण्यासाठी उघडलेल्या बँक अकाउंटसाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला. तसेच आर्थिक व्यवहारासाठी भारताव्यतिरिक्त नेपाळमधील बँक खात्याचाही वापर करण्यात आला आहे.
अनोळखी व्हिडिओ कॉल घेऊ नका
Whats Appवर येणारे अनोळखी व्हिडिओ कॉल उचलू नका अथवा त्यावर कुठलाही प्रतिसाद देऊ नका असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.