शेतातून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आराेपीस ७ वर्षाची सक्तमजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2021 04:02 PM2021-12-19T16:02:05+5:302021-12-19T16:05:40+5:30
Sexual Abuse : आरोपी प्रभू राम डुकरे याला सात वर्षाचा सश्रम तुरुंगवास आणि ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
लातूर : शेतामध्ये जनावरांना वैरण - पाणी करून घरी निघालेल्या अल्पवीयन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी लातूर येथील विशेष न्यायालयाने आरोपी प्रभू राम डुकरे याला सात वर्षांचा सश्रम तुरुंगवास आणि ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
अहमदपूर तालुक्यातील किनगाव पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना २ मार्च २०१७ राेजी घडली. शेतातील गाेठ्यात बांधलेल्या जनावरांना वैरण-पाणी करून पीडित मुलगी शेतातून घराकडे निघाली हाेती. दरम्यान, आराेपीने ये पोरी, इकडे ये... अशी हाक मारली. त्यावेळी अल्पवयीन मुलगी जागेवरच थांबली असता, आरोपीने माझ्याजवळ ये म्हणून पीडितेकडे जाऊन हाताला पकडून पिकात नेऊन लैंगिक अत्याचार केला. याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात आरोपी विराेधात गुरनं. २०/२०१७ नुसार दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी लातूरच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश बी. सी. कांबळे यांच्या न्यायालयात झाली. आरोपीविराेधात गुन्हा सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षाच्या वतीने एकूण ९ साक्षीदारांची साक्ष झाली. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील मंगेश महिंद्रकर, अतिरिक्त सरकारी वकील एस. आर. मुंदडा यांनी काम पाहिले.
या प्रकरणात पीडित मुलगी, तिचे आई-वडील यांच्यासह अन्य एक प्रत्यदर्शी साक्षीदाराचा पुरावा ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी प्रभू राम डुकरे याला कलम ३७६ भादंवि आणि कलम ४ बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदाप्रमाणे दोषी धरून ७ वर्षांचा सश्रम कारावास आणि ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात ॲड. विद्या वीर, ॲड. अंकिता धूत, ॲड. सोमेश्वर बिराजदार, ॲड. महादेवी गवळी यांनी सहकार्य केले. गुन्ह्याचा तपास किनगाव येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. उनवणे यांनी केला.