बापच करायचा लैंगिक अत्याचार, १८ वर्षीय मुलीची तक्रार; लहान बहिणीलाही सोडले नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 06:09 AM2024-09-11T06:09:14+5:302024-09-11T06:10:09+5:30
याप्रकरणी बालकल्याण समिती (सीडब्लूसी) कडेही तक्रार करण्यात आली होती.
मुंबई : व्ही. पी. रोड पोलिसांनी शनिवारी एका ५२ वर्षीय व्यक्तीला पोटच्या दोन अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक केली. याप्रकरणी त्याच्या १८ वर्षीय मुलीने तक्रार केली आहे.
तक्रारदार मुलगी ही तिचे वडील, आई आणि छोट्या बहिणीसह गिरगावमध्ये राहत होती. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिला अनाथालयात पाठविण्यात आले. तिला स्वत:च्या घरात सुरक्षित वाटत नव्हते, असे तिचे म्हणणे होते. याप्रकरणी बालकल्याण समिती (सीडब्लूसी) कडेही तक्रार करण्यात आली होती. दरम्यान मार्चमध्ये तिची आई अनाथालयात तिला भेटायला गेली, तेव्हा बाप छोट्या मुलीला नायगावच्या चाळीत नेऊन तिच्यावर अत्याचार करत असल्याचे आईने सांगितले. यामुळे धक्का बसलेल्या मुलीने स्वत:वरची आपबीतीही सांगितली.
बापाला चार दिवसांची कोठडी
याप्रकरणी सीडब्लूसीने तक्रार दाखल केल्यानंतर वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवत नराधम बापाला शनिवारी ताब्यात घेतले. मात्र गुन्हा प्रत्यक्ष गिरगावात घडल्यामुळे ते प्रकरण आता व्ही. पी. रोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. आरोपी बापाला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. पिडीतेची आई आणि लहान बहीण घरातून निघून गेलेले असून, सीडब्लूसी अधिकारी त्यांचा शोध घेत आहेत.
जीवे मारण्याची धमकी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार मुलगी २०११ मध्ये ५ वर्षांची असल्यापासून वडील तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याने या मुलीने कोणालाच हा प्रकार सांगितला नाही. २०१६ पर्यंत ती या मानसिक यातना सहन करत राहिली.