चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; अल्पवयीन मुलांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2020 05:42 AM2020-02-11T05:42:28+5:302020-02-11T05:42:40+5:30
कासारवडवली भागात राहणाऱ्या १२ आणि १४ वर्षीय दोन मुलांनी त्याच परिसरातील एका पाचवर्षीय मुलीला खेळायला जाण्याचे आमिष दाखवून ४ फेब्रुवारीला नजीकच्या झाडाझुडुपांमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले.
ठाणे : घोडबंदर रोड भागात एका पाचवर्षीय मुलीवर १२ आणि १५ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी दोघांची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी केली आहे. पीडित मुलीवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
कासारवडवली भागात राहणाऱ्या १२ आणि १४ वर्षीय दोन मुलांनी त्याच परिसरातील एका पाचवर्षीय मुलीला खेळायला जाण्याचे आमिष दाखवून ४ फेब्रुवारीला नजीकच्या झाडाझुडुपांमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केले. या प्रकाराबाबत कोणालाही न सांगण्याची तिला धमकी दिली. ही बाब पीडितेने पालकांना सांगितल्यानंतर तिला आईने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी ५ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी तिची रुग्णालयात जाऊन विचारपूस केल्यानंतर लैंगिक अत्याचार तसेच पोक्सोप्रमाणे दोन्ही अल्पवयीन मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला. बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्यांची ही दोन्ही मुले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांना त्याच परिसरातून ताब्यात घेतले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना भिवंडी येथील बालन्यायालयात हजर केले. या न्यायालयाने त्यांना बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.
मनसेने घेतली माहिती
मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह पदाधिकाºयांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयात जाऊन या मुलीच्या उपचाराची रुग्णालय प्रशासनाकडून माहिती घेतली. तिची प्रकृती सुधारत असून तिला बरे वाटल्यानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात येईल, असे ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले.