संतापजनक! मजुरीसाठी आलेल्या महिलेचे लैंगिक शोषण करून विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 07:44 PM2019-12-16T19:44:18+5:302019-12-16T19:47:25+5:30
दोन वेळा विक्री करून झाल्यानंतर तिसऱ्यांदा विक्री करण्याचा आरोपींचा डाव फसला.
गोंदिया - पोट भरण्यासाठी पैसे कमविण्याच्या उद्देशाने चार-पाच महिन्यांपूर्वी गोंदिया येथे आलेल्या एका २७ वर्षाच्या महिलेचे चार महिन्यापासून लैंगिक शोषण करुन तिची विक्री करण्यात आली. दोन वेळा विक्री करून झाल्यानंतर तिसऱ्यांदा विक्री करण्याचा आरोपींचा डाव फसला. परिणामी या प्रकरणात रामनगर पोलिसांनी ९ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या चान्ना-बाक्टी येथील २७ वर्षांची महिला चार ते पाच महिन्यापुर्वी गोंदिया येथे मजुरीचे काम करण्यासाठी आली होती. रामनगर येथील ओमप्रकाश नावाच्या इसमाने तिला स्वत:च्या घरी कामावर ठेऊन त्याने तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी करीत तिचे लैंगिक शोषण केले. काही दिवस तिचे लैंगिक शोषण करुन आरोपी ओमप्रकाशने त्याच्या ओळखीच्या असलेल्या रामनगर येथील तिघांना भेटवून दिले.
रामनगरातील आरोपी लाखन, किरण व लगडा या तिघांशी ओळख झाल्यावर त्यांनी मध्यप्रदेशाच्या राघोगड येथील सुनिता उदमसिंग मिना, उदमसिंग गप्पूलाल मिना व बुढढीबाई हरिचरण सैनी यांना ८० हजार रुपयात त्या महिलेला विक्री केले. त्या आरोपींनी विकत घेतल्यानंतर तिला पुन्हा संदीप हरिचरण सैनी व हरिचरण नाथूलाल सैनी रा.राघोगड यांना पैसे घेऊन विकले. त्यानंतर आरोपी संदीप सैनी याने त्या महिलेला काही दिवस पत्नी म्हणून ठेवून तिच्यावर बळजबरी केली. त्यानंतर त्याने तिला पुन्हा सुनिता उदमसिंह मिना या महिलेकडे दिले. तिने पुन्हा दोन मुलांशी सौदा करुन तिला विक्री करण्याचा प्रयत्न केला असतांना तो प्रयत्न फसला. याची भनक त्या पीडितेला लागताच तिने संधी साधून पळ काढला.
चाचोडा पोलीस ठाणे गाठून तिने पोलिसांना आपबिती सांगितली. परिणामी या संदर्भात पिडीत महिलेची तक्रार रामनगर पोलिसात दाखल करण्यात आली. १५ डिसेंबरच्या रात्री सदर ८ आरोपींवर भादंविच्या कलम ३६३,३६६,३७० (अ), ३७६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नोकरी देण्याच्या नावावर लैंगिक शोषण
कामाच्या शोधात आलेल्या महिलेला नोकरी देण्याचे आमिष देऊन तिचे लैंगीक शोषण करण्यात आले. ग्रामीण भागातील महिला नोकरीच्या शोधात आल्यास त्यांना नोकरीचे आमिष देऊन त्यांना देहव्यवसायात ओढण्याचा प्रयत्न केला जातो. ती पीडित महिला पाच महिन्यानंतर घरी पोहचली. परंतु तिच्या सारख्या किती महिलांवर अत्याचार झालेत किती महिला बेपत्ता आहेत याचा नेम नाही.
देहव्यवसायात ओढणारी टोळी सक्रीय?
महिलांच्या लाचारीचा फायदा घेत त्यांना देह व्यवसायात ओढण्याचा प्रयत्न केला जातो.महिलांना देहव्यवसायात ओढून त्यांच्या सौंदर्याचा फायदा घेत त्यांची विक्री हरियाणा, मध्यप्रदेश येथे केली जाते. हा देहव्यवसाय करणाऱ्या टोळीवर पोलीस लगाम लावणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.