पोलीस निरीक्षकाविरुद्ध लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल; कोल्डिंगमधून दिले होते गुंगीचे औषध
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 12:12 PM2020-09-24T12:12:04+5:302020-09-24T12:12:51+5:30
लैंगिक अत्याचार करत त्याचे फोटो व विडिओ रेकॉर्डिंग नातेवाइकांना दाखवण्याची दिली धमकी..
पुणे : फ्लॅट दाखविण्यासाठी नेऊन कोल्डिंगमधून गुंगीचे औषध पाजून लैंगिक अत्याचार करणाऱ्या व त्याचे फोटो व व्हिडिओ रेकॉडिंग नातेवाईकांना दाखविण्याची धमकी देणाऱ्या पोलीस निरीक्षकाविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
चंद्रकांत भगवानराव माने असे या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. सध्या त्यांची नेमणूक सोलापूर पोलीस प्रशिक्षण केंद्र येथे आहे.
याप्रकरणी एका ५० वर्षाच्या महिलेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार सप्टेंबर २००९ पासून आतापर्यंत सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत माने हे सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पुण्यात कार्यरत असताना त्यांची या महिलेबरोबर ओळख झाली. भवानी पेठेतील एक घर दाखविण्यासाठी माने याने या महिलेला नेले.तेथे कोल्डिंग्समधून तिला गुंगीचे औषध पाजले़ तिला गुंगी आल्यावर त्याने तिच्यावर बलात्कार केला.तसेच त्या प्रकाराचे फोटो व व्हिडिओ रेकॉडिंग केले. हा प्रकार समजल्यावर त्याने तिला हे फोटो व व्हिडिओ दाखवून ते नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची धमकी दिली. तिला लवकरच लग्न करुन असे आश्वासन देऊन तिच्याबरोबर वारंवार शारीरिक संबंध ठेवले. तिने अनेकदा लग्नाविषयी विचारल्यावर त्याने टाळाटाळ करायला सुरुवात केली. तसेच पोलीस ठाण्यात तक्रार केली तर वाईट परिणाम होतील, अशी धमकी दिली.१७ फेबुवारी २०२० रोजी माने याने फिर्यादीच्या मोबाईलवर व्हॉटस अपवर स्वत:चे अश्लिल फोटो पाठविले. त्यानंतर लॉकडाऊनमध्येही त्याने आपल्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चंद्रकांत माने हे पुण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून काम करत होते.त्यावेळी २००९ मध्ये या प्रकाराला सुरुवात झाली आहे. याबाबत फिर्यादीच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबाबतचे पुरावे पोलीस गोळा करीत असल्याचे समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितले.