सुरतमध्ये २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 05:13 AM2018-11-07T05:13:43+5:302018-11-07T05:13:51+5:30
तब्बल २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्यांचा कमांडिंग आॅफिसर व त्याची महिला सहायक यांना सोमवारी निलंबित करण्यात आले.
सुरत : तब्बल २५ महिला होमगार्डचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्यांचा कमांडिंग आॅफिसर व त्याची महिला सहायक यांना सोमवारी निलंबित करण्यात आले. या प्रकरणाचा चौकशी अहवाल आठवडाभरात हाती आल्यानंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे.
कमांडिंग आॅफिसर सोमनाथ घेरवाल व प्लाटून सार्जंट भावना कंथारिया यांनी आपला शारीरिक, मानसिक व लैंगिक छळ केल्याचा तक्रारवजा अर्ज महिला होमगार्डनी सुरतचे पोलीस आयुक्त सतीश शर्मा यांच्याकडे शुक्रवारी पाठविला होता, तसेच या अर्जाच्या प्रती गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी व गृहराज्यमंत्री प्रदीपसिंह जडेजा यांनाही धाडण्यात आल्या.
या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन होमगार्डचे डेप्युटी कमांडंट वीरेंद्रसिंह राणा यांनी सोमनाथ घेरवाल व भावना कंथारिया यांना निलंबित केले. या २५ महिला होमगार्डपैकी अंजना नायक यांनी सोमनाथ यांच्या विरोधात सुरत शहराचे होमगार्ड कमांड डॉ. प्रफुल्ल शिरोया यांच्याकडे एक वर्षापूर्वीच तक्रार दाखल केली होती. कामावर असताना कशा प्रकारे लैंगिक छळ केला जातो, याचा तपशीलही अंजना नायक यांनी कळविला होता.
सांगितली घरकामे
अंजना नायक गेल्या नऊ वर्षांपासून सुरतमध्ये होमगार्ड म्हणून काम करीत आहेत. सोमनाथ घेरवाल हा एकटाच राहत असून, त्याने एकदा तिला घरी बोलावून तेथील काही कामे करायला सांगितली. घरकामाला नकार देताच घेरवालने अंजना यांची बदली त्यांच्या घरापासून दूरच्या ठिकाणी केली.
अंजनाने लैंगिक छळासंदर्भात सुरत शहराच्या होमगार्ड कमांडंटकडे ८ सप्टेंबरला तक्रार केली; मात्र त्यानंतरही सोमनाथ घेरवालवर काहीही कारवाई झाली नाही. त्यामुळे महिला होमगार्डमध्ये असंतोष निर्माण झाला होता.