चॉकलेटचे आमिष दाखवून जंगलात तीन बालकांचे लैंगिक शोषण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2019 07:51 PM2019-08-23T19:51:29+5:302019-08-23T19:55:00+5:30
पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७७, ५०६, ३४ व सह कलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला.
अमरावती - चार महिन्यांपासून तीन बालकांवर लैंगिक अत्याचार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस चौकशीत उघड झाला. अनैसर्गिक कृत्याच्या या प्रकरणात फ्रेजरपुरा पोलिसांनी तीन आरोपींना शुक्रवारी अटक केली. रवि बबनराव कांबळे (२४), वैभव रामदास मेश्राम (२३, दोन्ही रा. वडाळी) आणि आकाश किशोर ठाकरे (२४, रा. भोईपुरा) अशी आरोपींची नावे आहेत.
एका १३ वर्षीय बालकाला जंगलात नेऊन त्याच्यावर पाच जणांनी अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांना गुरुवारी प्राप्त झाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७७, ५०६, ३४ व सह कलम ४, ६ पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविला. घटनेचे गांभीर्य पाहता, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू करून तिघांना शुक्रवारी अटक केली, तर दोन अल्पवयीन मुलांना चौकशीकरिता बोलाविले. आरोपी हे तीनही मुलांना चॉकलेट किंवा दुचाकीवर फिरविण्याचा बहाणा करून वडाळी तलावामागील जंगलात नेत होते. तेथे त्यांच्यावर आळीपाळीने जबरीने अनैसर्गिक कृत्य करीत होते, असे पोलिसांच्या चौकशीत पुढे आले आहे.
तीनही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे पुढील तपास करीत आहेत.
चाइल्ड लाइनने उघड केले लैंगिक शोषण
श्री हनुमान व्यायाम प्रसारक मडंळातील चाइल्ड लाइनकडे हे प्रकरण आले होते. तेथील पदाधिकाऱ्यांनी पीडित मुलाच्या घरी जाऊन त्यांना समुपदेशन केले. त्यानंतर बालकांना बालकल्याण समितीसमोर हजर केले. यानंतर पोलिसांत तक्रार नोंदविली गेली. बालकांसाठी काम करणाऱ्या चाइल्ड लाइनने गांभीर्य दाखविल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आली असून, शहरात अशाप्रकारे बालकांचे लैंगिक शोषण होत असेल, तर संबंधित व्यक्ती किंवा अन्य कुणीही अशा अमानवी कृत्यांची माहिती चाइल्ड लाइनला द्यावी, असे आवाहन चाइल्ड लाइनचे अजय देशमुख यांनी केले आहे.