‘शहीद हेमंत करकरे पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:01 PM2019-11-25T22:01:21+5:302019-11-25T22:03:16+5:30
सहकारी अधिकाऱ्यांकडून मानवंदना; जुई करकरे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई - चांगल्या पोलीस अधिकाऱ्यांची ओळख ही खात्यातून निघून गेल्यानंतर होत असलेल्या त्यांच्याबद्दलच्या आठवणीतून होत असते. देशभक्त व कर्तव्याला प्राधान्य देणारे शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल पोलीस वर्तुळ व नागरिकांमध्ये आजही आदाराचे स्थान कायम आहे. पोलीस दलासाठी ते नेहमीच प्रेरणादायक ठरणार आहेत, असे उद्गार निवृत्त अतिवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांतून व्यक्त करण्यात आली.
शहीद करकरे यांची कन्या जुई करकरे-नवरे यांनी लिहिलेल्या ‘हेमंत करकरे, अ डॉटर्स मेमोर’ या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय सुरक्षा समितीचे उपसल्लागार दत्ता पडसलगीकर यांच्या पत्नी आदिती पडसलगीकर, नवी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त के.एल.प्रसाद, नागपूरचे माजी आयुक्त अंकुश धनविजय यांच्या हस्ते झाले. यावेळी उपरोक्त व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त जे.एफ रिबेरो यांच्यासह अनेक मान्यवरांनी शहीद करकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
पुस्तक लिहिल्यामागील भूमिका मांडताना जुई करकरे म्हणाल्या ,‘आपले वडील हे उत्कृष्ट पोलीस अधिकाऱ्याबरोबरच एक चांगले नागरिक, चांगला पिता व कलेची आवड जपणारे होते. त्यांच्याबद्दल नेहमी उलटसुलट मते मांडण्यात आली. त्यांची खरी ओळख सर्वासमोर यावी, अशी माझ्या दिवंगत आईची इच्छा होती. तिच्या प्रेरणेमुळे आपण त्यांच्या आठवणी एकत्रित केल्या आहेत. त्यातून वडीलाबाबतची सत्य बाजू सर्वांसमोर येईल.’
के.एल.प्रसाद म्हणाले,‘ आमच्या बॅचमध्ये हेमंत करकरे व दत्ता करकरे हे सर्व क्षेत्रात उत्कृष्ठ होते. आम्ही सर्वजण भावाप्रमाणे एका कुटुंबाप्रमाणे रहात होतो. कर्तव्यदक्ष व प्रामाणिक अधिकारी असलेल्या करकरे यांनी कधीच पुर्वग्रह दुषित राहून काम केले नाही. त्यामुळे त्यांना काहीवेळा कॉँग्रेसबरोबरच तर अखेरच्या काळात आरएसएस सारख्या संघटनांकडून विरोध होत होता. ‘२६/११’च्या हल्याच्या दिवशी सायंकाळी आम्ही कार्यालयात भेटलो होतो. त्यावेळी मालेगाव बॉबस्फोटात त्यांनी हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केल्याने त्यांच्यावर काही घटकाकडून टीका होत होती. वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्यामुळे ते व्यतित होते. मात्र त्यांनी विचलित न होता सत्य शेवटपर्यत मांडण्याचे निश्चय कायम ठेवला होता. दुर्दवाने त्याच रात्री हल्यात ते , अशोक कामटे व विजय साळस्कर शहीद झाले. त्यांच्या अनेक आठवणी ताज्या असून त्यांचे कार्य हे समस्त पोलीस दलासाठी अभिमानास्पद आहे.
यावेळी अकुंश धनविजय, आदिती पडसलगीकर , अॅड. अनंत गाडगीळ यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाला शहीद पत्नी वनिता कामटे, निवृत्त पोलीस महासंचालक संजीव दयाल, एम.एन.सिंग, सुरक्षा महामंडळांचे महासंचालक डी. कनकरत्नम, महासंचालक (एफएसएल) हेमंत नागराळे आदी उपस्थित होते.
अडवाणी यांच्या टीकेमुळे व्यतित होते - रिबेरो
भारतीय पोलीस दलातील सवौत्कृष्ठ अधिकाऱ्यांमध्ये हेमंत करकरे यांचा समावेश अग्रस्थानी असल्याचे सांगून मुंबई माजी पोलीस आयुक्त जे.एफ.रिबेरो म्हणाले,‘ मालेगाव स्फोटातील तपासातील हिंदुत्वावादी संघटनेविरुद्ध सबळ पुराव्यानिशी प्रज्ञासिंग ठाकूर व इतरांना त्यांनी अटक केली होती. त्यामुळे भाजपाचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांनी केलेल्या टीकेमुळे ते व्यतित होते. त्यामुळे २५ नोव्हेंबरला सल्ला घेण्यासाठी माझ्याकडे आले होते. कोणी आक्षेप घेत असलेतरी सत्याची बाजू मांडत राहण्याबद्दल ते ठाम होते. त्यांना मी सत्य धर्म कायम ठेवण्याचा सल्ला देत आडवाणी यांच्याशी बोलून सत्य परिस्थिती सांगण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी भ्याड हल्यात ते शहीद झाले. त्यांची कर्तव्यदक्षता, कार्य विसरु न देणे हिच त्यांच्यासाठी खरी आंदराजली आहे. ’