शाहीन बाग: इसिसचा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; काश्मीरी दाम्पत्याला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 10:04 AM2020-03-09T10:04:11+5:302020-03-09T10:51:28+5:30
दिल्ली पोलिसांनुसार पकडला गेलेला दहशतवादी जहांबेज सामी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग हे दोघेही सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय आहेत.
नवी दिल्ली : सीएए विरोधात सुरू असलेल्या दिल्लीतील शाहीन बागमधील आंदोलकांना भडकविण्यासाठी इसिसची टीम कार्यरत झाली होती. शाहीन बाग पेटल्यानंतर काश्मीरी दांम्पत्याने दिल्लीत मोठा दहशतवादी हल्ला घडविण्याची तयारीही केली होती. मोठ्या प्रमाणावर शस्त्रे आणि स्फोटके जमिवण्याचे काम सुरू होते. मात्र, पोलिसांनी आधीच छापा टाकल्याने मोठा हिंसाचार टळला आहे.
दिल्ली पोलिसांनुसार पकडला गेलेला दहशतवादी जहांबेज सामी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग हे दोघेही सोशल मिडीयावर कमालीचे सक्रीय आहेत. दोघांचीही अनेक प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या नावाने खाती आहेत. या खात्यांद्वारे भारतीय मुसलमानांना एकजूट करून आणि सरकारविरोधात सीएएवरून आंदोलन भडकविण्याचे काम सुरू होते.
सामीच्या सायबरस्पेसमध्ये संशयस्पद हालचाली पाहून स्पेशल सेलने त्याच्यावर मागिल महिनाभरापासून नजर ठेवली होती. याशिवाय आयबीनेही दोघांच्याबाबतीत गुप्त माहिती दिली होती. चौकशीमध्ये सामीने सांगितले की, मुस्लिम बहुल भागात जाऊन लोकांना भडकविण्याचे काम करत होतो.
आयएसकेपीने त्यांच्यावर मुस्लिम तरुणांना संघटनेमध्ये भरती करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांना याद्वारे मोठ्या दहशतवादी हल्ल्याला यशस्वी करायचे होते. सामी शाहीन बाग आणि दिल्लीतील अन्य ठिकाणी जाऊन त्यांना हे भारत सरकार हटवायचे असल्याचे सांगत होता.
इसिसशी संबंध
सामीने त्याच्या पत्नीची इसिस समर्थक सोशल मिडीयावर तीन चार अकाऊंट असल्याचे सांगितले. हिना ही सोशल मिडीयावर दहशतवादी विचाराच्या तरुणांना शोधून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम करत होती. तसेच त्यांना दहशतवादाशी जोडण्यासाठी मध्यस्थाची भुमिकाही पार पाडत होती.
एक सहकारी तिहारमध्ये
सामीचा एक सहकारी तिहार जेलमध्ये असून त्याच्यावर खटला दाखल आहे. इसिसमध्ये अनेक भारतीय तरुण असून काही वर्षांपासून हे दहशतवादी अफगाणिस्तानच्या खोरासन या प्रांतामध्ये राहत आहेत. ते या दोघांच्याही संपर्कात असतात असेही पोलिसांनी सांगितले.