जमीलवर गोळीबार करताना शाहीदनेच चालविली दुचाकी; प्रत्यक्ष गोळीबार करणारा मात्र पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 08:48 PM2020-11-28T20:48:28+5:302020-11-28T20:48:48+5:30
Crime News : उत्तर प्रदेशातून लवकरच प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्याला सुद्धा ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली.
ठाणे: महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे राबोडीतील शाखाध्यक्ष जमील अहमद शेख (49) यांच्यावर गोळी झाडतेवेळी शाहिद शेख (31, रा. राबोडी, ठाणे) हाच मोटारसायकल चालवित होता, अशी धक्कादायक माहिती आता तपासात समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातून लवकरच प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्याला सुद्धा ताब्यात घेतले जाणार असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-एकच्या पथकाने 25 नोव्हेंबर रोजी या हत्याकांडातील महत्वाचा आरोपी शाहीद याला राबोडीतून अटक केली. त्याच्याकडून एक मोटारकारही जप्त केली आहे.
या हत्याकांडानंतर शाहीदनेच यातील आणखी दोघांना शिर्डीमार्गे चाळीसगाव येथे सोडले. त्यानंतर यातील आरोपी उत्तरप्रदेशात पसार झाले. मारेक-यांना हत्यारे देणारा आणि शाहीदच्या दुचाकीवर मागे बसून प्रत्यक्ष गोळीबार करणारा अशा दोघांना लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे. कोणीतरी सुपारी देऊन योजनाबद्दपणो ही हत्या केल्याचे आतापर्यंच्या तपासातून समोर आले आहे.
सध्या युनिट एकच्या ताब्यात असलेला शाहीद काही ठिकाणी दिशाभूल करीत आहे. चौकशीमध्ये तो अजूनही त्रोटक माहिती देत असल्यामुळे तपासात अनेक अडचणी येत आहेत. या हत्याकांडामध्ये किमान चार ते पाच आरोपींचा समावेश असल्याची शक्यता तपास पथकातील अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.
"जमील यांच्यावर प्रत्यक्ष गोळीबार करणाऱ्याची बरीच माहिती तपास पथकाच्या हाती लागली आहे. त्यामुळेच त्याच्यासह दोघांना ताब्यात घेण्यासाठी दोन पथके उत्तरप्रदेशात रवाना केली आहेत. त्या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर सूत्रधारही हाती लागण्याची शक्यता आहे."
- संजय येनपुरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे अन्वेषण विभाग, ठाणे शहर