कोणालाच थांगपत्ता लागू दिला नाही, पाच महिने विद्यार्थिनी बनली, महिला पोलिसाने लावला रॅगिंगचा छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 05:50 AM2022-12-13T05:50:57+5:302022-12-13T05:51:27+5:30
मेडिकल कॉलेजमधील प्रकरणात ११ पैकी नऊ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
इंदूर : रॅगिंगच्या एका ऑनलाइन तक्रारीची दखल घेत इंदूर पोलिसांनी एका महिला पोलिसाला विद्यार्थिनी बनविले आणि कॉलेजमध्ये पाठविले. जवळपास पाच महिने ही महिला पोलिस विद्यार्थिनी बनून मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग करणाऱ्यांचा शोध घेत होती. अखेर ११ जणांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे, तर काही आरोपी विद्यार्थी फरार आहेत.
पोलिस आयुक्त हरिनारायण चारी मिश्र यांनी सांगितले की, जुलैमध्ये एमजीएममध्ये विद्यार्थिनींनी गोपनीय पद्धतीने ॲण्टिरॅगिंग कमिटीकडे ऑनलाइन तक्रार केली होती. त्यानंतर पूर्ण प्रकरणात एमजीएम मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाकडून संयोगितागंज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांकडे ना तक्रारदाराचे नाव होते, ना आरोपींची ओळख.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एका पथक तयार करत यात एक महिला पोलिस शालिनी चौहान (वय २४) यांना विद्यार्थिनी बनवून वेशभूषेत कॉलेजमध्ये पोहोचविले. ही महिला पोलिस विद्यार्थिनी बनून तासन तास कॉलेजच्या कँटीनमध्ये बसून राहत होती. हळूहळू तिने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींशी मैत्री केली. त्यानंतर तिने रॅगिंगबद्दल बोलणे सुरू केले. यातून तिला कॉलेजमध्ये झालेल्या रॅगिंगची माहिती मिळत गेली. नंतर एका-एका आरोपीची ओळख निश्चित करून ती वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत राहिली.
महिला पोलिस शालिनी म्हणतात...
पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना अटक केली आहे, तर काही जण फरार आहेत. शालिनी चौहान यांच्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे. शालिनी यांनी सांगितले की, वडिलांच्या मृत्यूनंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांची पोलिस खात्यात नियुक्ती झाली. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी माझी निवड केली तेव्हा ठरविले की, पूर्ण क्षमतेने आरोपींना शोधून काढण्यासाठी काम करू. आपली ओळख लपवीत मी विद्यार्थिनी झाले. वरिष्ठ अधिकारी आणि पोलिस ठाण्याचे प्रभारी यांच्या निर्देशावरून काम करत राहिले. या प्रकरणाचा छडा लावून आपण आपले कर्तव्य पूर्ण केल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.