लज्जास्पद! लग्नसमारंभात बालिकेचा सफाई कामगाराने केला विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 06:51 PM2020-02-27T18:51:55+5:302020-02-27T18:53:56+5:30
सफाई कामगाराला अटक
यवतमाळ - येथील दारव्हा मार्गावर एका हॉटेलमध्ये लग्न सोहळा होता. या लग्नात सहभागी होण्यासाठी आई-वडिलांसह दहा वर्षाची चिमुकली तेथे आली. याच हॉटेलमध्ये सफाई कामगार म्हणून असलेल्या एकाने या चिमुकलीला पकडून विनयभंग केला. ही घटना बुधवारी दुपारी ३ वाजता घडली. संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
अक्षय शंकर चांदेकर (२५) रा. विठोली ता. दिग्रस असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. अक्षय हा हॉटेलमध्ये काही दिवसांपासून साफसफाईचे काम करतो. बुधवारी येथील लॉनवर विवाह सोहळा होता. त्यामध्ये अनेक पाहुणे मंडळी सहभागी होण्यासाठी आले होते. एक चिमुकलीही आपल्या आई-वडिलांसह या सोहळ्यासाठी आले. खेळत असताना चिमुकलीला एकट्यात पकडून तिचा विनयभंग करण्यात आला. तिने हा प्रकार लगेच आपल्या आई-वडिलांना सांगितला. याची तत्काळ दखल घेऊन त्या संशयिताला ताब्यात घेतले. तसेच घटनेची माहिती लोहारा पोलिसांना दिली. ठाणेदार सचिन लुले यांनी पथकासह हॉटेल गाठले. त्या आरोपीला ताब्यात घेतले. तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता मुलीने सांगितलेला प्रकार तंतोतंत खरा ठरला. या प्रकरणी वृत्तलिहिस्तोवर लोहारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.