‘ती’ गायब, मग इन्स्टाग्राम फॉलोअर्स कसे वाढताहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2021 06:31 AM2021-12-14T06:31:06+5:302021-12-14T06:31:28+5:30
‘ती’ गायब, मग इन्स्टाग्राम फॉलोअर्स कसे वाढताहेत?
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई : स्वदिच्छा साने गायब झाली असली, तरी तिच्या खासगी इन्स्टाग्राम अकाउंटमधील फॉलोअर्स मात्र वाढत आहेत. त्यामुळे हे अकाउंट नेमके कोण ऑपरेट करत आहे याची चौकशी पोलिसांनी करावी. त्यातूनच हे गूढ उकलेल, असे बॅण्ड स्टॅंड येथील जीवरक्षक मिथू सिंह याने 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
सिंह याने केलेल्या दाव्यानुसार, २९ नोव्हेंबरच्या रात्री साडेबाराच्या सुमारास त्याने स्वदिच्छाला बॅण्ड स्टॅंडच्या गणेशनगर रहिवासी संघ परिसरातील किनाऱ्यावरील खडकावर फिरताना पाहिले. प्रियकर, कुटुंबीय, तसेच तिच्या डॉक्टरी पेशाबाबत बऱ्याच गप्पा मारल्यानंतर, तिने स्वतः तिचे खासगी इन्स्टाग्राम खाते आपल्याशी शेअर केल्याचा दावा सिंहने केला. पहाटे चारच्या सुमारास ओहोटी आल्यावर मला आत्मचिंतन करायचे आहे, तुम्ही जा, असे तिने सांगितल्यावर तो खडकावरून निघून गेला. त्यानंतर त्याचा भाचा जुगेश पोलिसांना घेऊन आला, तेव्हा ती हरवली असल्याचे त्यांना समजले.
या दरम्यान, स्वदिच्छाच्या खासगी अकाउंटवरील फॉलोअर्सची संख्या वाढत असल्याचे त्याचे म्हणणे आहे. हे खाते खासगी असेल तर जोपर्यंत खातेधारक एखादी रिक्वेस्ट मान्य करत नाही, तोपर्यंत ते खाते कोणालाही पाहता येत नाही. त्यामुळे हे खाते स्वदिच्छा किंवा तिच्या जवळचीच एखादी व्यक्ती ते हाताळत आहे. त्यामुळे पोलीस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले, तर तिच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ सहज उकलेल, असेही मिथू सिंह याचे म्हणणे असून ती आत्महत्या करणे शक्य नसल्याचेही त्याने सांगितले.