मृतदेह लपविण्यासाठी ती विमानाऐवजी टॅक्सीने...; टॅक्सी चालकाच्या हुशारीमुळे सीईओला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 12:40 PM2024-01-12T12:40:59+5:302024-01-12T12:42:37+5:30
बॅग बऱ्यापैकी जड होती
पणजी: गोव्यातील हॉटेलमध्ये बंगळुरूच्या स्टार्टअप कंपनीच्या सीईओ सूचना सेठ आपल्या मुलाची हत्या केल्यानंतर लाल ट्रॉली बॅग घेऊन बाहेर आल्या. बॅग बऱ्यापैकी जड होती. विमानाने जाण्याऐवजी तिने टॅक्सीने बंगळुरूला जाण्याचा आग्रह धरला, जेणेकरून ती आपल्या मुलाचा मृतदेह लपवू शकेल आणि घेऊन जाता येईल. पण, टॅक्सी चालकाच्या हुशारीमुळे ती पोलिसांच्या हाती लागली.
रॉय जॉन डिसोझा असे या टॅक्सी चालकाचे नाव असून तो उत्तर गोव्याचा रहिवासी आहे. चालकाने सूचनाला गोवा विमानतळावर सोडण्याची ऑफर दिली. पण, कितीही वेळ लागला तरी तिला टॅक्सीने जायचे असा आग्रह तिने धरला. त्यामुळे चालकाला संशय आला. याशिवाय संपूर्ण प्रवासात सूचना सेठ गप्प राहिली होती.
कोकणी भाषेत संवाद
- चालकाने सांगितले की, ८ जानेवारी रोजी सकाळी गोव्याच्या कळंगुट पोलिस निरीक्षकांचा फोन आला. इन्स्पेक्टरने त्याला विचारले की सूचना एकटी आहे की तिच्यासोबत कोणी मूल आहे.
- चालकाने ती एकटीच असल्याचे सांगितले. इन्स्पेक्टर आणि टॅक्सी चालक कोकणी भाषेत बोलत होते. त्यामुळे सूचनाला त्यांचे संभाषण समजू शकले नाही. पोलिसांनी संपूर्ण घटना चालकाला सांगितली. यानंतर पोलिसांनी टॅक्सी चालकाच्या फोनवरून सूचनाची चौकशी केली.