'मला म्हणाली की, तिला पैसे मिळतील आणि बॉसला तिकीट"; हरयाणातील भाजप नेत्याशी संबंधित बलात्कार प्रकरणाला नवे वळण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 20:24 IST2025-01-15T20:23:42+5:302025-01-15T20:24:52+5:30
Mohan Lal Badoli Case: भाजपचे हरयाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यावर एका महिलेने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला. या प्रकरणी गुन्हाही दाखल झालेला आहे.

'मला म्हणाली की, तिला पैसे मिळतील आणि बॉसला तिकीट"; हरयाणातील भाजप नेत्याशी संबंधित बलात्कार प्रकरणाला नवे वळण
हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली आणि गायक रॉकी मित्तल यांनी बलात्कार केल्याचा आरोप दिल्लीतील एका महिलेने केला. या प्रकरणी पोलिसांनी बदोली आणि मित्तल यांच्याविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हाही दाखल केला आहे. दरम्यान, ज्या मैत्रिणीसोबत पीडिता फिरायला गेली होती, त्या मैत्रिणीने नवा खुलासा केल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ज्या महिलेने भाजपचे नेते मोहन लाल बदोली आणि रॉकी मित्तल यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला. त्या तक्रारदार महिलेच्या मैत्रिणीने पत्रकार परिषद घेऊन वेगळाच खुलासा केला.
'आम्ही मोहन लाल बदोली यांना भेटलोच नाही'
तक्रारदार महिलेच्या मैत्रिणीने सांगितले की, "माझे नाव पूनम आहे. माझी मैत्रीण, तिचा बॉस आणि मी असे तिघेही जुलै २०२३ मध्ये कसौलीला फिरायला गेलो होतो. आम्ही तिघेही गायक रॉकी मित्तल यांना भेटलो होतो. पण, ही भेट औपचारिक होती. भेटीनंतर मित्तल तिथून निघून गेले होते. त्यानंतर मी, माझी मैत्रीण आणि तिचा बॉस अमित एकाच रुममध्ये झोपलो होतो."
पीडित महिलेची मैत्रीण म्हणाली की, "मी मोहन लाल बदोली यांना बघितले नाही. नाही आम्ही लोक हॉटेलमध्ये भेटलो. आम्हाला रॉकी मित्तलच हॉटेलच्या लॉबीमध्ये भेटले होते. पण, आम्ही मद्यपान केले नाही. सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. या प्रकरणात मला साक्षीदार बनवले गेले आहे."
'ती मला म्हणाली, या प्रकरणात साथ दे'
"माझ्या ज्या मैत्रिणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तिने मला सांगितले की, या प्रकरणात साथ दे. ती मला म्हणाली की, तिला पैसे मिळतील आणि तिच्या बॉसला तिकीट मिळेल किंवा अध्यक्षपद मिळेल. ही बातमी समोर आल्यानंतर याबद्दल मी माझ्या पालकांना माहिती दिली", असेही पीडितेच्या मैत्रिणीने सांगितले.
हरयाणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहन लाल बदोली यांच्यावर दिल्लीतील एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. हिमाचल प्रदेशातील कसौली येथे या प्रकरणात गुन्हाही दाखल झाला आहे.
मोहन लाल बदोली आणि गायक रॉकी मित्तल आम्हाला गप्पा मारण्यासाठी रुममध्ये घेऊन गेले. त्यानंतर दारू घेण्याची विनंती केली. नकार दिल्यानंतर त्यांनी बळजबरी पाजली आणि जीवे मारण्याची धमकी देत माझ्यावर दोघांनी बलात्कार केला, असा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणानंतर काँग्रेसने मोहन लाल बदोली यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे.
प्रकरण तापलेलं असतानाच तक्रारदार महिलेच्या मैत्रिणीने आता वेगळाच खुलासा करत असे काही घडले नसल्याचे म्हटले आहे.