‘ती’ गाडीखाली अडकल्याचे होते माहीत; आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचा शाेध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 07:49 AM2023-01-06T07:49:08+5:302023-01-06T07:50:03+5:30
विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १८ पथके या प्रकरणाचा तपास करत असून, सर्व पैलू तपासले जात आहेत.
नवी दिल्ली : ‘हिट अँड रन’ प्रकरणातील पाच आरोपींना संरक्षण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन फरारी आरोपींचा शोध सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले. नवीन आरोपींपैकी एक आरोपीचा भाऊ अमित आहे. तो गाडी चालवत होता. त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही. त्याला वाचवण्यासाठीच दीपकचे नाव पुढे करण्यात आले. मुलगी गाडीखाली अडकल्याची माहिती आरोपीला होती. यानंतरही तो गाडी चालवत राहिला, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले.
विशेष पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सागर प्रीत हुडा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, १८ पथके या प्रकरणाचा तपास करत असून, सर्व पैलू तपासले जात आहेत. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे आणखी दोन जणांचा सहभाग समोर आला असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. आशुतोष आणि अंकुश अशी ओळख असलेले दोघे आरोपी इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असे त्यांनी सांगितले. अंजलीचा मोबाइल अद्याप सापडलेला नाही. याशिवाय अंजली आणि आरोपींची ओळख नव्हती, असेही पोलिसांनी सांगितले.
अंजलीच्या आईचा निधीवर संशय, पोलिसांवर आरोप
- मृत अंजलीच्या आईने बुधवारी रात्री मुलगी अंजलीच्या हत्येत निधीचाही हात असू शकतो, असा संशय व्यक्त केला. ‘मी निधीला ओळखत नाही.
- मी तिला कधीच पाहिले नाही. अंजलीने मद्यपान केलेले नव्हते. ती कधीच मद्यधुंद अवस्थेत घरी आली नाही.
- पोलिसांनी अंजलीच्या भावाला मध्यरात्री उचलले. मुलीला बदनाम करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे,’ असा दावा त्यांनी केला.