Sheena Bora Murder Case, Indrani Mukherjee: आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, इंद्राणीच्या मुलीची विशेष न्यायालयाला विनंती
By दीप्ती देशमुख | Published: September 14, 2022 06:44 PM2022-09-14T18:44:09+5:302022-09-14T18:44:46+5:30
या विनंतीवर कोर्टाने काय निर्णय दिला.. वाचा सविस्तर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: आईला मिठी मारण्याची परवानगी द्यावी, अशी तोंडी विनंती शीना बोरा हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीची मुलगी विधी हिने बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाला केली. काही दिवसांपूर्वी विशेष न्यायालयाने विधीला इंद्राणीबरोबर राहण्यास नकार दिल्यानंतर तिने न्यायालयाला ही विनंती केली. न्यायालयाने फेटाळलेल्या अर्जात विधीने म्हटले होते की, आईला २०१५ मध्ये अटक करण्यात आली तेव्हा आपण अल्पवयीन होतो. गेली सात वर्षे आईच्या प्रेमापासून, सहवास आणि जिव्हाळ्यापासून आपल्याला वंचित ठेवण्यात आले आहे. मे महिन्यात इंद्राणीची जामिनावर सुटका करताना तिला कोणत्याही साक्षीदाराशी संपर्क न साधण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने घातली होती, असे म्हणत विशेष सीबीआय न्यायालयाने विधीचा आईबरोबर राहण्यास परवानगी मागणारा अर्ज न्यायालयाने फेटाळला. शीना बोरा हत्येप्रकरणी २०१५ मध्ये सीबीआयने विधीचा जबाब नोंदविला आहे.
'विधी भारतात आली आहे. ती तिच्या आईला भेटली नाही. ती आईला किमान मिठी तरी मारू शकते का?' अशी विचारणा विधीच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. विशेष न्यायाधीश एस. पी. नाईक निंबाळकर म्हणाले की, इंद्राणीला जामीन देताना सर्वोच्च न्यायालयाने अटी ठेवल्या होत्या. त्यामुळे मी अशा विनंतीला परवानगी देऊ शकत नाही किंवा नाकारू शकत नाही,' असे न्यायालयाने म्हटले.
विधी तिच्या आईला केवळ मिठी मारेल, तिच्याशी काही बोलणार नाही, असे विधीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. विधी ही इंद्राणी मुखर्जी आणि संजीव खन्ना यांची मुलगी आहे. पीटर मुखर्जीच्या आधी इंद्राणीचा संजीव खन्नाबरोबर विवाह झाला होता. संजीव खन्नाही शीना बोरा हत्येप्रकरणात आरोपी आहे.